राहुल भट यांच्या हत्येच्या निषेधार्थ 350 काश्मिरी पंडितांनी राज्यपालांकडे पाठवले सामूहिक राजीनामे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 07:29 PM2022-05-13T19:29:07+5:302022-05-13T19:36:29+5:30
Kashmiri Pandit : राहुल भट यांची गुरुवारी बडगाम जिल्ह्यातील एका सरकारी कार्यालयात लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. तेव्हापासून खोऱ्यात प्रचंड तणावाचे वातावरण आहे.
श्रीनगर : गुरुवारी 35 वर्षीय काश्मिरी पंडित राहुल भट यांच्या हत्येवरून जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात तणाव वाढला आहे. राहुल बट यांच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या 350 काश्मिरी पंडितांनी राज्यपालांकडे सामूहिक राजीनामे पाठवले आहेत. राहुल भट यांची गुरुवारी बडगाम जिल्ह्यातील एका सरकारी कार्यालयात लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. तेव्हापासून खोऱ्यात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. लष्कर-ए-तैयबा संघटनेशी संबंध असलेल्या काश्मीर टायगर्स या संघटनेने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.
विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी सुरू करण्यात आलेल्या रोजगार कार्यक्रमांतर्गत राहुल भट यांना नोकरी मिळाली होती. ते चाडूरा येथील तहसील कार्यालयात कार्यरत होते. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर राहुल भट यांना तात्काळ श्रीनगरच्या एसएमएचएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, गुरुवारी रात्री काश्मिरी पंडितांनी जम्मू-श्रीनगर महामार्ग आणि बारामुल्ला-श्रीनगर महामार्ग रोखून राहुल भट यांच्या हत्येचा निषेध केला. यावेळी त्यांनी राहुल बट यांचा मृतदेह रस्त्यावर ठेवून सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
#BREAKING: Mass resignation by more than 350 Kashmiri Pandit Prime Minister Package Employees in Kashmir sent to Lt. Governor Manoj Sinha today. Pandits say they don’t feel safe after killing of KP Govt Employee Rahul Bhat by terrorists. @narendramodi@AmitShahpic.twitter.com/d5tqPYqcaF
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) May 13, 2022
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेचारच्या सुमारास लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी तहसील कार्यालयात घुसले. त्यानंतर दहशतवाद्यांनी राहुल भट यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला. राहुल भट हे बडगाम जिल्ह्यातील विस्थापित वसाहतीत राहत होते आणि गेल्या आठ वर्षांपासून तेथे काम करत होते. राहुल भट यांच्या पश्चात पत्नी, त्यांचा पाच वर्षांचा मुलगा आणि वडील असा परिवार आहे.