रिटर्न्स न भरणाऱ्यांकडून ३,५६९ कोटी रु. वसूल
By admin | Published: March 24, 2015 11:45 PM2015-03-24T23:45:26+5:302015-03-24T23:45:26+5:30
आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात टॅक्स रिटर्न्स न भरणाऱ्या किंवा ते चुकीचे भरणाऱ्या करदात्यांकडून ३,५६९ कोटी रुपये गोळा केले आहेत.
बंगळुरू : आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात टॅक्स रिटर्न्स न भरणाऱ्या किंवा ते चुकीचे भरणाऱ्या करदात्यांकडून ३,५६९ कोटी रुपये गोळा केले आहेत. यासाठी विभागाने तब्बल २० लाखांहून अधिक सूचनापत्रे जारी केली. आयकर खात्याने दोन वर्षांपूर्वी रिटर्न्स न भरणाऱ्यांचा माग काढणारी प्रणाली सुरू केली होती. याच प्रणालीद्वारे आयटी (माहिती तंत्रज्ञान) विभागाने प्रतिष्ठाने आणि व्यक्तींनी रिटर्न्समध्ये बिनचूक उल्लेख न केलेले अथवा जाणीवपूर्वक दडविलेले मोठे व्यवहार हुडकून काढले. त्यानंतर सूचनापत्रे पाठवत वसुली प्रक्रिया सुरू करण्यात आली.
यावर्षी फेब्रुवारीपर्यंत करदात्यांना आम्ही २० लाख सूचनापत्रे पाठविली असून या प्रक्रियेनंतर आम्हाला ८ लाख ५७ हजार २१८ रिटर्न्स प्राप्त झाले. यातून आयकर विभागाला १५३६.४३ कोटी रुपयांचा आगाऊ कर आणि २,०३१.७६ कोटी रुपयांचा स्वयं-मूल्यमापन कर प्राप्त झाला, असे आयकर खात्याच्या आयुक्त (माध्यम आणि नियोजन) रेखा शुक्ला यांनी मंगळवारी पत्रकारांना येथे सांगितले.
मालमत्ता खरेदी, मुदत ठेवीतील गुंतवणूक, सोने व दागिन्यांची खरेदी, तसेच क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे केलेल्या मोठ्या व्यवहारांच्या आधारे या करदात्यांची माहिती गोळा करण्यात आली. रिटर्न्स न भरणाऱ्यांचा माग काढणारा स्वतंत्र व पूर्णकालीन विभाग पुढील वर्षीच्या प्रारंभी सुरू होणार असून या विभागाला डाटा वेअर हाऊसिंग अँड बिझनेस इंटेलिजन्स डिरेक्टोरेट असे संबोधले जाणार आहे. करदात्यांच्या सुविधेसाठी विभाग देशभरात नवे २५२ आयकर संपर्क केंद्रे स्थापन करणार आहे.