60 वर्षांवरील 366 खासदार घेणार लस; ४६ मंत्र्यांसह सर्व पक्षांच्या बड्या नेत्यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 04:59 AM2021-03-02T04:59:01+5:302021-03-02T04:59:12+5:30
संसदेचे अधिवेशन ८ मार्च रोजी सुरू होत असून, बहुसंख्य खासदार त्याचवेळी लस घेण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पी. चिदम्बरम यांच्यासह प्रफुल पटेल, नारायण राणे, विनय सहस्त्रबुद्धे अशा अनेक नेत्यांनाही लस दिली जाईल.
- हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यापाठोपाठ देशातील ६० हून अधिक वय असलेले ३६६ खासदारही आता कोरोवरील लस लवकरच घेतील. त्यात नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे, संजय धोत्रे, रामदास आठवले यांच्यासह ४६ मंत्री आहेत. काही मंत्र्यांनी आजच लस घेतली, तर काही जण उद्या, मंगळवारी घेणार आहेत.
संसदेचे अधिवेशन ८ मार्च रोजी सुरू होत असून, बहुसंख्य खासदार त्याचवेळी लस घेण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पी. चिदम्बरम यांच्यासह प्रफुल पटेल, नारायण राणे, विनय सहस्त्रबुद्धे अशा अनेक नेत्यांनाही लस दिली जाईल. पीयूष गोयल यांचे वय कमी आहेत आणि त्यांना अन्य व्याधी नाहीत. ते बहुधा नंतर लस घेतील. शरद पवार यांनी सोमवारी मुंबईतच लस घेतली. लोकसभेतील २१७ व राज्यसभेतील १४९ सदस्यांचे वय ६० हून अधिक आहे. मोदी मंत्रिमंडळाचे सरासरी वय ५९.६३ आहेत, तर या लोकसभेतील सदस्यांचे सरासरी वय ५४ आहे. याशिवाय विविध राज्यांतील ४१२७ पैकी सुमारे २४ आमदारांचे वय ६० हून अधिक आहे. त्यांनाही आताच लस दिली जाईल.
बिहारमध्ये सर्वांना मोफत कोरोना लस
बिहारमध्ये सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही देण्यात येणाऱ्या लसींचा सर्व खर्च नितीशकुमार सरकार करणार आहे. बिहारमध्ये मोफत कोरोना लस दिली जाईल असे आश्वासन एनडीएने विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात दिले होते.
आता आत्मविश्वास वाढेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लस घेतली. त्यामुळे आतापर्यंत लस घेण्यास टाळाटाळ करणारे आरोग्य कर्मचारी व कोरोना योद्धेही आता लस घेण्यास तयार होतील. पंतप्रधानांनी लस घेतली असल्याने त्यांनाही लसीविषयी विश्वास वाढेल, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटत आहे.
जर्मनीत कोरोनाची तिसरी लाट?
जर्मनीतील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे नीट पालन न केल्यास फैलावाची तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी दिला आहे. अशी लाट आल्यास जर्मनीत अतिशय कडक लॉकडाऊन जाहीर करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.
११.४६ कोटी रुग्ण जगभरात
जगभरात ११ कोटी ४६ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील ९ कोटी २ लाख जण बरे झाले. अमेरिकेमध्ये २ कोटी ९२ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील १ कोटी ९६ लाख लोक बरे झाले. त्या देशात ९० लाख लोकांवर उपचार सुरू आहेत व सव्वापाच लाख लोकांचा बळी गेला आहे. ब्राझिलमध्ये १ कोटी ५ लाखांहून अधिक रुग्ण असून त्यातील २ लाख ५५ हजार जण मरण पावले.