मोदींच्या परदेश दौ-यांवर ३७ कोटींचा खर्च
By admin | Published: September 7, 2015 06:19 PM2015-09-07T18:19:54+5:302015-09-07T18:19:54+5:30
वारंवार परदेश दौ-यांमुळे टीकेचे धनी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौ-यांवर तब्बल ३७ कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती उघड झाली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - वारंवार परदेश दौ-यांमुळे टीकेचे धनी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौ-यांवर तब्बल ३७ कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती उघड झाली आहे. जून २०१४ ते जून २०१५ या कालावधीत मोदींनी तब्बल २० देशांचे दौरे केले असून यातील सर्वात महागडा दौरा ऑस्ट्रेलियाचा ठरला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौ-यांसंदर्भात माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवण्यात आली होती. यात २० पैकी १६ देशांच्या उच्चायुक्तांनी मोदींच्या दौ-यासाठी झालेल्या खर्चाची माहिती दिली. तर जपान, श्रीलंका, दक्षिण कोरिया व फ्रान्सने याची माहिती दिलेली नाही. मोदींचा सर्वात स्वस्त दौरा भूटानचा ठरला असून या दौ-यासाठी ४१ लाख ३३ हजार रुपये एवढाच खर्च झाला. ऑस्ट्रेलिया दौ-यात मोदी व त्यांच्यासोबतचे अधिका-यांच्या निवासासाठी सुमारे साडे पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर भाड्यावर घेतलेल्या गाड्यांसाठी अडीच कोटी रुपये खर्च झाले.
मोदींच्या अमेरिका दौ-यात मोदी व अधिका-यांच्या निवासासाठी ११ लाख तर मोदींच्या सुरेक्षासाठी तैनात असलेल्या एसपीजी पथकाच्या निवासासाठी ९.१६ लाख रुपये खर्च झाले.