Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात 38 नवे चेहरे; नारायण राणे कॅबिनेट मंत्री; भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार राज्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 06:39 AM2021-07-08T06:39:24+5:302021-07-08T06:41:55+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महिला, अनुसूचित जाती-जमाती, अन्य मागासवर्गीय या गटांमधील एकूण ३१ मंत्री आहेत. त्यापैकी काही मंत्री हे माजी सनदी अधिकारी, आयआयटीतून शिक्षण घेतलेले तर काही जण डॉक्टर व अन्य पेशातीलआहेत.
हरिश गुप्ता -
नवी दिल्ली : साऱ्या देशाला अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी होऊन ४३ मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी झाला. त्यामध्ये १५ जणांनी कॅबिनेट तर २८ जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना कॅबिनेट तर कपिल पाटील, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे चारही जण वेगळ्या पक्षांतून भाजपमध्ये आले आहेत. मोदींचे मंत्रिमंडळ आता ७८ जणांचे झाले असून त्यात ३८ नव्या चेहेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महिला, अनुसूचित जाती-जमाती, अन्य मागासवर्गीय या गटांमधील एकूण ३१ मंत्री आहेत. त्यापैकी काही मंत्री हे माजी सनदी अधिकारी, आयआयटीतून शिक्षण घेतलेले तर काही जण डॉक्टर व अन्य पेशातीलआहेत. स्वातंत्र्योत्तर काळातील हे सर्वात तरुण मंत्रिमंडळ असणार आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात झालेला समावेश हेही एक मोठे वैशिष्ट्य आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना जुन्या मंत्र्यांपैकी १२ जणांचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यामध्ये प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन आदी ज्येष्ठ मंत्र्यांचा समावेश आहे.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर एक दोन महिन्यांत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी राजकीय निरीक्षकांनी बांधलेली अटकळ अखेर खरी ठरली. गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत कोरोना साथीमुळे देशाची आर्थिक स्थिती डळमळीत झाली होती. तसेच कोरोना लसी, औषधे, आॅक्सिजन अशा अनेक गोष्टींचा तुटवडा जाणवू लागला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला कोरोना स्थिती नीटपणे हाताळता आली नाही अशी टीका बहुतांश राज्यातून होऊ लागली होती.
२०२४ मध्ये होणाºया लोकसभा निवडणुका तसेच येत्या एक दोन वर्षात उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसह काही राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन व केंद्र सरकारच्या कारभारावर कोणीही बोट ठेवू नये यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणे आवश्यक बनले होते. ती गरज बुधवारी पूर्ण झाली आहे.
हरदीप पुरी, भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर यांना बढती
हरदीप पुरी, भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर आदींना राज्यमंत्रीपदावरून कॅबिनेट मंत्रीपदी बढती देण्यात आली आहे. त्यांनी केलेले काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पसंतीस उतरले होते.
२५ राज्यांना मिळाले प्रतिनिधीत्व
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात २५ राज्यांना प्रतिनिधीत्व मिळाले आहे. ज्या पंधरा कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यांच्यात आठ नवे चेहरे असून सात जणांना बढती मिळाली आहे.
नारायण राणे, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री
गेल्या ४० वर्षांच्या कारकीर्दीमध्ये चेंबूर येथील शिवसेना शाखाप्रमुख, मुंबई महापालिकेत १९८५ ते १९९१ नगरसेवक, बेस्ट समिती अध्यक्ष ते राज्याचे मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री अशी त्यांची वाटचाल आहे. कणकवली तालुक्यातील वरवडे गावी गरीब कुटुंबात १० एप्रिल १९५२ रोजी त्यांचा जन्म झाला. १९९० पासून सलग सहावेळा आमदार म्हणून ते निवडून आले. त्यांनी नंतर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०१८ मध्ये भाजपला पाठिंबा जाहीर करून ते राज्यसभेवर निवडून गेले.
डॉ. भागवत कराड, अर्थ राज्यमंत्री
अहमदपूर तालुक्यातील चिखली हे डॉ. भागवत कराड यांचे मूळ गाव. १८ मार्च २०२० रोजी राज्यसभेवर निवडले गेले. सव्वा वर्षाच्या काळात त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. वंजारी समाजाचे असलेले डॉ. कराड यांचा समावेश हा महाराष्ट्रातील वंजारी समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने आणि पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठीही झाल्याचे दिसते. भागवत कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सान्निध्यात आले.
कपिल पाटील, पंचायत राज राज्यमंत्री
कपिल पाटील यांच्या रुपाने ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे. भिवंडीतील मोरेश्वर पाटील व मणिबाई पाटील यांचे पुत्र असलेले कपिल यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी कला शाखेतून पदवी घेतली आहे. १९८८ मध्ये प्रथम पाटील यांनी दिवे अंजूर ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. १९९२ मध्ये ते भिवंडी पंचायत समितीचे सदस्य तर म्हणून निवडून आले. ते मार्च २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले.
डॉ. भारती पवार, आराेग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री
सलग दोन निवडणुकीत विजय संपादन करून सात वर्षे जि. प. सदस्य म्हणून काम केल्यानंतर, थेट लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या डॉ. भारती पवार यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. लोकसभा निवडणुकीचा कोणताही अनुभव पाठीशी नसताना दोन वर्षांपूर्वी दिंडोरी मतदार संघातून पवार या भाजपच्या उमेदवारीवर मतदारांना सामोऱ्या गेल्या व निवडूनही आल्या.
दानवेंकडे रेल्वे, काेळसा आणि खाण राज्यमंत्रिपद
रावसाहेब दानवे यांच्याकडे रेल्वे, काेळसा आणि खाण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी त्यांच्याकडे ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्रिपदाचा कार्यभार हाेता.
१२ मंत्र्यांचे राजीनामे
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या काही तास आधी केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे मंंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद या मंत्र्यांसह १२ केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामध्ये शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, संतोषकुमार गंगवार, देबश्री चौधरी, रतनलाल कटारिया, संजय धोत्रे, थावरचंद गेहलोत, डी. व्ही. सदानंद गौडा, प्रतापचंद्र सारंगी, आदींचीही नावे आहेत.
निष्ठेपेक्षा राजकीय गणित माेठे
या मंत्रिमंडळ विस्तारात राजकीय निष्ठेपेक्षा राजकीय गणितांचा विचार जास्त केला आहे. त्यामुळेच नारायण राणे, ज्योतिरादित्य सिंधिया, सर्वानंद सोनोवाल यांना कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली व ज्यांची मंत्रीपदे काढून घेण्यात आली त्यात रा. स्व. संघ व भाजपशी एकनिष्ठ असलेल्या मंत्र्यांची बहुसंख्या आहे. या साऱ्या गोष्टींना छेद देणारी घटना म्हणजे मध्य प्रदेशमधून सातवेळा खासदार म्हणून निवडून आलेले वीरेंद्रकुमार यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. ते पूर्वी संघ स्वयंसेवक होते व नंतर भाजपमध्ये सक्रिय झाले होते.
पीयूष गाेयल यांच्याकडे रेल्वेऐवजी वस्त्राेद्याेग खाते
पीयूष गाेयल यांच्याकडील रेल्वे खात्याचा पदभार काढून त्यांना वस्त्राेद्याेग मंत्रालय देण्यात आले आहे. हे खाते अगाेदर स्मृती इराणी यांच्याकडे हाेते.
वैशिष्ट्ये काय? -
- अनुसूचित जातीचे १२ मंत्री, त्यातील २ कॅबिनेट मंत्री
- अनुसूचित जमातीचे ८ मंत्री, त्यातील ३ कॅबिनेट मंत्री
- मागासवर्गीय गटातील २७ मंत्री, त्यातील २ कॅबिनेट मंत्री
- अल्पसंख्याक गटातील ५ मंत्री, त्यातील ३ कॅबिनेट मंत्री
- ११ महिला मंत्री, त्यातील २ कॅबिनेट मंत्री
- ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेले १४ मंत्री, त्यातील ६ कॅबिनेट मंत्री
- नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे सरासरी वय ५८ वर्षे
- मंत्र्यांमध्ये १२ वकिल आणि ६ डॉक्टर्स