Ahmedabad bomb blast case: ३८ आरोपींना फाशी तर ११ जणांना जन्मठेप, अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टाने सुनावली जबर शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 12:04 PM2022-02-18T12:04:20+5:302022-02-18T12:23:03+5:30
Ahmedabad bomb blast case : २००८ मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये कोर्टाने आज दोषी आरोपींनी जबर शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात दोषी ठरवलेल्या आरोपींपैकी तब्बल ३८ आरोपींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
अहमदाबाद - २००८ मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये कोर्टाने आज दोषी आरोपींनी जबर शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात दोषी ठरवलेल्या आरोपींपैकी तब्बल ३८ आरोपींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
२६ जुलै २००८ रोजी अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. हे सर्व बॉम्बस्फोट केवळ एका तासात घडले होते. या स्फोटानं संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्यात ५६ निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता. तर २०० हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी अहमदाबादमध्ये २० तर सुरतमध्ये १५ गुन्हे दाखल केले होते. संबंधित गुन्ह्यातील सर्व आरोपी एकाच कटाचा भाग असल्याने सर्व गुन्हे एकत्रित करून एकच खटला भरवण्यात आला होता. तर अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोटांपूर्वी इंडियन मुजाहिदीनच्या (IM) दहशतवाद्यांनी जयपूर आणि वाराणसीमध्ये देखील बॉम्बस्फोट घडवून आणला होता.
2008 Ahmedabad serial bomb blast case | A special court pronounces death sentence to 38 out of 49 convicts pic.twitter.com/CtcEWGze2z
— ANI (@ANI) February 18, 2022
अहमदाबादमध्ये २० ठिकाणी झालेल्या २१ बॉम्बस्फोटांप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये २८ आरोपी ७ राज्यांच्या तुरुंगात कैद आहेत. या प्रकरणी ९ हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले, ज्यात ६ हजार कागदोपत्री पुरावे ठेवण्यात आले होते. या प्रकरणाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत गुजरातमध्ये ९ न्यायाधीश बदलले. त्याचबरोबर १११७ साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले.