पंजाबमध्ये विषारी दारूचे ३८ बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 06:45 AM2020-08-01T06:45:17+5:302020-08-01T06:45:28+5:30
आंध्रात सॅनिटायझर प्यायल्याने ९ जणांचा मृत्यू
अमृतसर /अमरावती (आंध्र प्रदेश ) : पंजाबच्या अमृतसर, बटाला आणि तरुणतारण या जिल्ह्यांमध्ये विषारी दारू प्यायल्याने ३८ जण, तर आंध्र प्रदेशच्या प्रकाशाम जिल्ह्यात सॅनिटायझर प्यायल्याने ९ जण मरण पावले असून, त्यामुळे दोन्ही राज्यांत खळबळ उडाली आहे. दोन्ही राज्यांत पोलिसांनी छापेमारी सुरू केली असून, काही जणांना अटकही केली आहे.
पंजाबमध्ये विषारी दारू बनवून, ती विकल्याबद्दल एका महिलेला अटक केली आहे. या धंद्याच्या सूत्रधारांचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पोलिसांचे विशेष तपास पथक स्थापन केले आहे. ही विषारी दारू आणखी काही जिल्ह्यांत विकली गेली आहे का, याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
लॉकडाउनच्या काळात पंजाबमध्ये दारूची दुकाने अनेक ठिकाणी बंद आहेत, तर काही ठिकाणी त्यावर निर्बंध आहेत. तसेच दारूचा काळाबाजारही सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी बेकायदेशीर हातभट्ट्या सुरू झाल्या आहेत. तेथूनच ही दारू विकली गेली असावी, असा अंदाज आहे. मात्र त्यात मुद्दाम विषारी द्रव्य मिसळण्यात आले की मिश्रणात चूक झाल्याने विषारी दारू तयार झाली, याचाही शोध पोलीस घेत आहेत. ही दारू स्वस्तात मिळाल्यामुळे लोकांनी ती प्राशन केली असावी, असे पोलिसांना वाटते आहे.
दारू न मिळाल्याने प्यायले सॅनिटायझर
लॉकडाउनमुळे आंध्र प्रदेशातही दारूच्या विक्रीवर खूप निर्बंध आहेत. गावांमध्ये दारू मिळेनाशी झाल्याने अनेक ठिकाणी लोक सॅनिटायझर पिऊ लागले आहेत. प्रकाशम जिल्ह्यातील चेरीकुडी गावातील काही जणही सॅनिटायझर प्यायले आणि त्यातील ९ जण गुरुवार व शुक्रवारी या दोन दिवसांत मरण पावले. गेल्या काही दिवसांत दुकानांतून सॅनिटायझरची प्रचंड प्रमाणात विक्री वाढल्याचे आढळले आहे. मरण पावलेले सारे गरीब पुरुष असून, त्यात तिघे भिकारी आहेत.