जिल्हा बॅँकेस कर्जमाफीचे ३.८७ कोटी निर्णय: आघाडी सरकारच्या धोरणाची युतीच्या काळात अंमलबजावणी
By admin | Published: February 19, 2016 10:26 PM2016-02-19T22:26:19+5:302016-02-20T00:44:44+5:30
जळगाव : आघाडी सरकारच्या काळात कर्ज माफीबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी युती सरकारने करत जिल्हा बॅँकेस बलुतेदार संस्थांच्या कर्ज माफीचे ३ कोटी ८७ लाख रूपये मंजूर झाले आहेत. जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी सहकार मंत्र्याशी या संदर्भात केलेल्या चर्चेनंतर केवळ जळगाव जिल्हाच नव्हे तर राज्यातील सर्व जिल्हा बॅँकांना हा निधी मिळणार आहे.
आघाडी सरकारच्या काळात २०१२ मध्ये शेतकर्यांना कर्ज माफीचा निर्णय घेण्यात आला होता. शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करताना बॅँकांच्या त्यावेळी नाकेनऊ आले होते. केवळ कर्जमाफी होणार म्हणून अनेकांकडून कर्ज भरणेही बंद झाले होते. त्यामुळे जिल्हा बॅँका अडचणीत आल्या होत्या. मात्र नंतर शासनाकडून टप्प्याटप्प्याने अनुदान मिळत गेले. मात्र बलुतेदार संस्थांचे माफ केलेले कर्ज अद्याप प्राप्त नव्हते. त्यामुळे जिल्हा बॅँकेच्या एनपीएही वाढलेला दिसत होता.
सहकार मंत्र्यांकडे चर्चा
दरम्यान, याप्रश्नी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन याप्रश्नी चर्चा केली. सहकार सचिव सिंधू यावेळी उपस्थित होते. या चर्चेनंतर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व जिल्हा बॅँकांना बलुतेदार संस्थांच्या कर्ज माफीचे पैसे देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा बॅँकेस यामुळे ३ कोटी ८७ लाखाचा निधी मिळणार असल्याचे अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी सांगितले.
--------
नोकर भरतीचा लवकरच निर्णय
जिल्हा बॅँकेने ५०० कर्मचार्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव राज्याच्या सहकार विभागाला पाठविला होता. मात्र त्यावर अद्याप निर्णय न झाल्याने या बैठकीत पहिल्या टप्प्यात २०० कर्मचारी नियुक्तीची परवानगी मिळावी अशी विनंती करण्यात आली. त्यावरही सकारात्मक निर्णयाचे आश्वासन सहकार मंत्र्यांनी दिले. येत्या कॅबिनेट मध्ये त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
----
कोट
बॅँकेचे संगणकीकरण आता आटोपत आले असून नवीन कर्मचारी वर्ग मिळाल्यास संगणक विषयातील तज्ज्ञांना शाखांवर देता येईल व बॅँकेच्या कामांना यामुळे गती मिळेल.
-रोहिणी खडसे-खेवलकर, अध्यक्षा, जिल्हा बॅँक.