३९ भारतीयांचे मृतदेह आज आणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 01:16 AM2018-04-02T01:16:29+5:302018-04-02T01:16:29+5:30
युद्धग्रस्त इराकमध्ये ठार मारल्या गेलेल्या ३९ भारतीयांचे मृतदेह भारतात आणण्यासाठी परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री व्ही. के. सिंह हे रविवारी इराकला रवाना झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारी मृतदेह दाखल होण्याची अपेक्षा आहे.
नवी दिल्ली - युद्धग्रस्त इराकमध्ये ठार मारल्या गेलेल्या ३९ भारतीयांचे मृतदेह भारतात आणण्यासाठी परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री व्ही. के. सिंह हे रविवारी इराकला रवाना झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारी मृतदेह दाखल होण्याची अपेक्षा आहे.
सिंह दुपारी १ वाजता हिंदोन विमानतळावरून रवाना झाले. परत येताच सिंह आधी अमृतसरला व त्यानंतर पाटणा व कोलकाताला जाऊन मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देतील. काही मृतांच्या नातेवाइकांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती.
जून २०१४ मध्ये इसिस या दहशतवादी गटाने इराकच्या मोसूल गावातून ४० भारतीयांचे अपहरण केले होते. एकाने मी बांगलादेशचा मुस्लीम असल्याचे सांगून स्वत:ची सुटका करून घेतली होती. ही माहिती स्वराज यांनी संसदेत गेल्या मार्चमध्ये सांगितली होती. या भारतीयांचे मृतदेह मोसूलच्या वायव्येकडील बदूश गावात ताब्यात घेण्यात आले, असे स्वराज्य म्हणाल्या होत्या. ठार मारण्यात आलेल्या ३९ जणांमध्ये पंजाबचे २७, हिमाचल प्रदेशचे चार, पश्चिम बंगालचे दोन व उर्वरित बिहारचे आहेत.