युवकाच्या पोटात ३९ नाणी, कसाबसा जीव वाचला; कारण ऐकून डॉक्टरांनी कपाळावर हात मारला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 10:17 AM2024-02-27T10:17:01+5:302024-02-27T10:17:22+5:30
रुग्णाला ७ दिवस रुग्णालयात राहावे लागले. यानंतर या युवकाला डिस्चार्ज देण्यात आला.
नवी दिल्ली - देशाच्या राजधानी दिल्लीत एक विचित्र घटना समोर आली आहे. मृत्यूशी झुंज देणाऱ्या एका व्यक्तीला गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्लीतील हा २६ वर्षीय तरुण मानसिक आजाराचा बळी होता. त्याला सलग २० दिवस पोटात दुखत होते आणि सतत उलट्या होत होत्या. २० दिवस त्याने नीट काही खाल्ले नव्हते. तो जे काही खात होता ते उलट्यातून बाहेर पडायचे. या युवकाला अखेर दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलच्या इमर्जन्सीमध्ये आणले असता डॉक्टरांनी जे पाहिले ते पाहून त्यांना धक्काच बसला.
वैद्यकीय तपासणीदरम्यान रुग्णाच्या पोटात ३९ नाणी आढळून आली. ही नाणी एक, दोन आणि पाच रुपयांची होती. याशिवाय ३७ छोटी-मोठी मॅग्नेट नाणी सापडली, जी वेगवेगळ्या आकारांची होती. काही त्रिकोणी, काही हृदयाच्या आकाराचे होते. एकदा डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले की या व्यक्तीच्या पोटात इतकी नाणी कशी पोहोचली. चौकशीदरम्यान, रुग्णाने डॉक्टरांना सांगितले की या धातूंमध्ये झिंक असते आणि जर त्याने ही नाणी गिळली तर तो निरोगी होईल आणि झिंक त्याच्या शरीरात पुरेशा प्रमाणात पोहोचेल असा त्याने दावा केला.
रुग्णाचा हा दावा ऐकून डॉक्टरांनी कपाळावर हात मारला. कसेबसे डॉक्टरांनी योग्य उपचार करून या रुग्णाचे प्राण वाचवले. त्याच्या पोटातून सर्व नाणी बाहेर काढण्यात आली. रुग्णाला ७ दिवस रुग्णालयात राहावे लागले. यानंतर या युवकाला डिस्चार्ज देण्यात आला. पोटात कोणतीही नको असलेली गोष्ट टाकू नये. असे करणे जीवघेणे ठरू शकते असं डॉक्टरांनी युवकाला घरी पाठवण्यापूर्वी समुपदेशनाद्वारे समजावून सांगितले.