३९ आयएएस अधिकाऱ्यांची चौकशी
By admin | Published: June 28, 2017 12:34 AM2017-06-28T00:34:21+5:302017-06-28T00:34:21+5:30
भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहाराच्या आरोपांवरून ३९ आयएएस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहाराच्या आरोपांवरून ३९ आयएएस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आयएएस अधिकाऱ्यांबाबत नोडल अॅथॉरिटीच्या स्वरूपात काम करणाऱ्या डिपार्टमेंट आॅफ पर्सनल अँड ट्रेनिंगमार्फत ही कारवाई केली जात आहे. या अधिकाऱ्यांबरोबरच केंद्रीय सचिवालय सेवेतील २९ अधिकारीही शिस्तभंगाच्या कारवाईचा सामना करीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारींच्या आधारावर आणि सर्व्हिस रेकॉर्डचा आढावा घेतल्यानंतर ६८ अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. यात काही जण वरिष्ठ स्तरावर कार्यरत आहेत. केंद्र सरकार सेवा व प्रशासनाची पद्धत आणखी सुधारण्याच्या प्रयत्नांतर्गत आपल्या कर्मचाऱ्यांचा आढावा घेत आहे.
नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा त्यांच्या सेवाकाळात दोन वेळा घेतला जातो. यातील पहिला नोकरीत निवड झाल्यानंतर १५ वर्षांनी आणि २५ वर्षांनंतर. काम न करणाऱ्या १२९ कर्मचाऱ्यांना मागील वर्षी केंद्र सरकारने सक्तीची सेवानिवृत्ती दिली. यात आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. कामचुकार कर्मचारी, अधिकाऱ्यांना शोधण्यासाठी ६७,००० जणांच्या सर्व्हिस रेकॉर्डची तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील सुमारे २५,००० कर्मचारी देशभरातील व अ दर्जाचे आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, केंद्र सरकारच्या सेवेत ४८ लाख ८५ हजार कर्मचारी काम करीत आहेत.