इसिसच्या ताब्यातील ३९ भारतीय जिवंत
By admin | Published: December 1, 2014 12:03 AM2014-12-01T00:03:55+5:302014-12-01T00:03:55+5:30
इस्लामिक स्टेट ऊर्फ इसिस या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात असणारे ३९ भारतीय जिवंत असल्याचा दावा पाकिस्तानी तालिबानने केला
बगदाद : इस्लामिक स्टेट ऊर्फ इसिस या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात असणारे ३९ भारतीय जिवंत असल्याचा दावा पाकिस्तानी तालिबानने केला असून, संडे गॉर्जियन वृत्तपत्राला त्यांनी ही माहिती दिली आहे. ही माहिती इराकमधील कमांडरच्या हवाल्याने दिल्याचा दावा तेहरिक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) च्या सूत्रांनी केला आहे.
टीटीपीच्या सूत्रांनी शनिवारी इसिस कमांडरसोबत दोन वेळा बोलणी केली. दोन्हीही वेळा हे भारतीय जिवंत असल्याचे नाव न जाहीर करण्याच्या अटीवर या कमांडरने सांगितले असे टीटीपीचे म्हणणे आहे. इसिसच्या ताब्यात असणाऱ्या मोसूल शहरात बांधकाम साईटवर भारतीय कामगार काम करत होते. जून महिन्यात इस्लामिक स्टेटने त्यांचे अपहरण केले आहे. त्यातील एकाने त्यांच्या ताब्यातून स्वत:ची सुटका करून घेतली आहे. मोसूल येथे काम करणाऱ्या भारतीय नर्सना ताब्यात घेण्याच्या आधी या कामगारांना ताब्यात घेतले आहे. हे भारतीय जिवंत असल्याचा पुरावा नाही, तसेच त्यांना मारले गेल्याचेही ठोस वृत्त नाही, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शुक्रवारी संसदेत सांगितले होते.