आंध्र प्रदेशात रेल्वे अपघातात ३९ ठार
By admin | Published: January 23, 2017 04:23 AM2017-01-23T04:23:18+5:302017-01-23T04:23:18+5:30
जगदलपूर - भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने, ३९ जण ठार तर ६९ प्रवासी जखमी झाल्याची दुर्घटना आंध्र प्रदेशात
कुनेरु (आंध्र प्रदेश) : जगदलपूर - भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने, ३९ जण ठार तर ६९ प्रवासी जखमी झाल्याची दुर्घटना आंध्र प्रदेशात विजयनगर जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा घडली. गत तीन महिन्यांतील हा तिसरा मोठा अपघात आहे.
जखमींपैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मृतात बहुतांश ओडिशातील नागरिक आहेत.
या अपघातातील मृतांची संख्या वाढू शकते. कारण अपघातग्रस्त डब्यात आणखी काही प्रवासी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. ही रेल्वे जगदलपूरहून भुवनेश्वरला जात असताना, शनिवारी रात्री ११च्या सुमारास हा अपघात झाला. कुनेरु स्टेशनजवळ रेल्वेचे इंजिन आणि नऊ डब्बे रुळावरून घसरले. यात दोन वातानुकूलित कोच, चार स्लिपर कोच, दोन सामान्य श्रेणीतील कोचचा यात समावेश आहे. अपघातानंतर यातील चार डबे उलटले.
नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या कुनेरु भागात रेल्वेला अपघात झाल्याने संशय व्यक्त होत असला, तरी याचा माओवाद्यांशी संबंध असल्याची शक्यता ओडिशा पोलिसांनी फेटाळली आहे, तर रेल्वे रुळाला तडे गेल्यानेच हा अपघात झाला असावा, अशी शक्यता रेल्वे विभागाने व्यक्त केली जात आहे. (वृत्तसंस्था)