तामिळनाडूत ३९ जागा : अद्रमुक-भाजपा युतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 06:36 AM2019-02-05T06:36:35+5:302019-02-05T06:36:46+5:30
आॅल इंडिया अण्णा मुन्नेत्र कझगम (अण्णा द्रमुक) व भाजपाची आगामी लोकसभा निवडणुकांत युती होण्याची शक्यता असून यासंदर्भातील अंतिम बोलणी येत्या आठवड्यात पूर्ण होतील असे सूत्रांनी सांगितले.
चेन्नई : आॅल इंडिया अण्णा मुन्नेत्र कझगम (अण्णा द्रमुक) व भाजपाची आगामी लोकसभा निवडणुकांत युती होण्याची शक्यता असून यासंदर्भातील अंतिम बोलणी येत्या आठवड्यात पूर्ण होतील असे सूत्रांनी सांगितले.
भाजपाशी युती करणे, जागावाटप, प्रचारमोहिम, जाहीरनामा या सर्व गोष्टींवर साकल्याने विचार करण्यासाठी अण्णा द्रमुकने आपल्या पक्षनेत्यांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा होऊन भाजपाशी
युती करण्याच्या निर्णयावर १० फेब्रुवारीनंतर शिक्कामोर्तब करण्याचे ठरविण्यात आले.
तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या ३९ जागा असून त्यातील किमान २४ जागा अण्णाद्रमुक हव्या आहेत. त्यानंतर उरलेल्या जागांचे भाजपा, रामदास यांचा पीएमके, विजयकांत यांचा डीएमडीके, जी. के. वासन यांचा तामिळ मनिला काँग्रेस, के. कृष्णस्वाम यांचा पुतिया तामिझगम व शिक्षणतज्ज्ञ टी. आर. पाचुमुथू
यांच्या आयजेके या मित्रपक्षांमध्ये वाटप व्हावे अशी भूमिका अण्णा द्रमुकने घेतली आहे.
निर्मला सीतारामन यांची महत्त्वपूर्ण भूमिका
तामिळनाडूचे मुख्यमंत्री इडप्पडी के. पलानीस्वामी व मंत्री एस. पी. वेलुमणी, पी. तंगामणी हे युती करण्यासंदर्भात संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या संपर्कात आहेत. भाजपा नेत्याने सांगितले की, युतीबाबत अण्णा द्रमुक व भाजपामध्ये प्राथमिक बोलणी झाली आहेत. अंतरिम अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजनांचा फायदा तामिळनाडूमध्ये युतीला विजय मिळण्यास होऊ शकतो असे अण्णाद्रमुकच्या काही नेत्यांचे मत आहे.