स्टेट बँक वसूल करणार ३९०० कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 12:26 AM2018-09-19T00:26:37+5:302018-09-19T00:26:39+5:30
एनपीए खात्यांचा लिलाव; आठ बड्या कंपन्यांचा समावेश
मुंबई : बुडीत खात्यांमुळे (एनपीए) तयार झालेला तोटा कमी करण्यासाठी स्टेट बँकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यासाठी बँक आठ एनपीए खात्यांचा लिलाव करणार आहे. यातून ३९०० कोटी वसूल होणार आहेत.
स्टेट बँक आॅफ इंडिया सलग ६७ वर्षे नफ्यात होती. पण दोन वर्षांपूर्वी सहयोगी बँकांचे या बँकेत विलीनीकरण झाल्याने तेथील एनपीएचा भार पडून २०१७-१८ मध्ये बँकेला मोठा तोटा झाला. एप्रिल ते जून २०१८ या तिमाहीतसुद्धा बँकेला ४,८७६ कोटींचा तोटा झाला. तोटा कमी करण्यासाठी बँकेने एनपीए खात्यांचा लिलाव सुरू केला आहे. हा लिलाव २६ सप्टेंबरला आॅनलाइन होत आहे.
लोखंड क्षेत्रातील आठ कंपन्यांच्या एनपीए खात्याचा यात समावेश आहे. यातील सहा कंपन्या कोलकात्यातील आहेत. सर्वात मोठा एनपीए कोलकाताच्या रोहित फेरो टेक कंपनीचा आहे. या कंपनीने १३२०.३७ कोटी बुडवले आहेत. वर्धा येथील महालक्ष्मी टीएमटी प्रा.लि. ने ४०९.७८ कोटी बुडवले आहेत. बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड अर्थात ‘बिल्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कंपनीने बँकेचे ४७.१७ कोटी बुडवले असून त्या खात्याचाही लिलाव होणार आहे.
३३00 कोटी वसूल
या आर्थिक वर्षात स्टेट बँकेने याआधी आॅगस्टमध्ये दोन एनपीए खात्यांच्या लिलावातून २४९० कोटी रुपये व १२ खात्यांच्या लिलावातून ८४८.५४ कोटी रुपये एप्रिल महिन्यात वसूल केले होते.