नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांच्या प्रवासावर ३९३ कोटी खर्च; माहिती अधिकारात उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 05:55 AM2019-05-12T05:55:58+5:302019-05-12T06:00:09+5:30
अनिल गलगली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या गेल्या पाच वर्षांतील परदेशी व देशांतर्गत प्रवासांवरील खर्चाची माहिती मागितली होती.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री व राज्यमंत्र्यांनी गेल्या ५ वर्षांत केलेल्या परदेश व देशांतर्गत प्रवासावर ३९३ कोटी ५७ लाख ५१ हजार ८९० रुपये खर्च झाला. विदेश दौऱ्यांवर २९२ कोटी रुपये, तर देशांतर्गत प्रवासावर ११० कोटी रुपये खर्च झाला. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळविली आहे.
कॅबिनेट मंत्र्यांच्या परदेश प्रवासावर गेल्या पाच वर्षांत २६२ कोटी ८३ लाख १० हजार ६८५ रुपये , तर देशांतर्गत प्रवासांवर एकूण ४८ कोटी ५३ लाख ९ हजार ५८४ रुपये खर्च झाले. राज्यमंत्र्यांच्या परदेश प्रवासांवर २९ कोटी १२ लाख ५ हजार १७० रुपये, तर देशांतर्गत प्रवासांवर ५३ कोटी ९ लाख २६ हजार ४५१ रुपये खर्च झाले आहेत.
अनिल गलगली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या गेल्या पाच वर्षांतील परदेशी व देशांतर्गत प्रवासांवरील खर्चाची माहिती मागितली होती. त्यांना मिळालेल्या माहिती कॅबिनेट व राज्यमंत्र्यांच्या परदेशी आणि देशांतर्गत प्रवासांवर झालेल्या खर्चाचा समावेश आहे. मात्र, पंतप्रधानांच्या दौऱ्यांवरील खर्चाचा तपशील नाही. मात्र सरकारने प्रत्येक वर्षी कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री यांच्या दौºयांवर झालेल्या वर्षवार तपशील दिला आहे.
अनिल गलगली म्हणाले की, पंतप्रधानांसह कोणत्या मंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांनी किती प्रवास केला आहे, त्याचे विवरण देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाही. याचा तपशील मिळणे आवश्यक आहे.
२,0२१ कोटींचे काय?
डिसेंबर, २०१८ मध्ये राज्यसभेतील सरकारने पंतप्रधानांचे विदेश दौºयांसाठी २,0२१ कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगितले होते. यामध्ये चार्टड फ्लाइट, विमानाची देखभाल व दुरुस्ती व पंतप्रधानांच्या दौºयादरम्यान पुरविण्यात येणाºया हॉटलाइन सुविधेचा उल्लेख होता, पण पंतप्रधानांच्या खर्चाची ही माहिती गलगली यांना सरकारने दिलेली नाही. प्रत्येक मंत्र्यांच्या दौºयाबाबत सविस्तर माहिती न दिल्याबद्दल गलगली यांनी नाराजी व्यक्त केली.