3 फूट उंचीचा दहशतवादी धोक्याची नवी घंटा, नूर मोहम्मदनं सांभाळतोय जैश-ए-मोहम्मदची कमान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 10:09 AM2017-10-19T10:09:42+5:302017-10-19T11:45:09+5:30
जम्मू काश्मीरमध्ये तीन फूट उंचीचा दहशतवादी धोक्याची नवीन घंटा बनला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कारवायांमागे जैश-ए- मोहम्मदच्या नूर मोहम्मद तंत्रेचा हात असल्याचे माहिती समोर आली आहे.
श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये तीन फूट उंचीचा एक दहशतवादी मोठी समस्या बनवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कारवायांमागे 'जैश-ए- मोहम्मद'चा नूर मोहम्मद तंत्रेचा हात असल्याचे माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील त्रालच्या नूर मोहम्मदनं दक्षिण काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदची कमान सांभाळली आहे. तंत्रेला 2003मध्ये दिल्लीतून अटक करण्यात आली होती आणि पीओटीए कोर्टानं त्याला 2011मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यादरम्यान मिळालेल्या पॅरोलवर नूर मोहम्मदनं पळ काढला आणि पुन्हा तो दहशतवादी संघटना जैश-ए- मोहम्मदमध्ये सहभागी झाला.
'इंडियन एक्स्प्रेस'नं दिलेल्या माहितीनुसार, अवंतिपुराचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, नूर पुन्हा जैश-ए- मोहम्मदमध्ये सहभागी झाला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिका-यानंही असेही सांगितले की, ''नूर मोहम्मद तंत्रे यावेळी जैश-ए-मोहम्मदमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. काश्मीरमध्ये घडणा-या दहशतवादी घटनांमागे नूर मोहम्मद आणि कमांडर मुफ्ती वकासची प्रमुख भूमिका आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तंत्रेनं जैश-ए-मोहम्मदच्या अशा दहशतवाद्यांचे समर्थन केले आहे ज्यांनी ऑगस्ट महिन्यात पुलवामा जिल्ह्यात पोलीस लाईनवर हल्ला केला होता. ऑगस्ट महिन्यात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात 8 सुरक्षा रक्षक शहीद झाले होत तर यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. याशिवाय, 3 ऑक्टोबरला श्रीनगर इंटरनॅशनल एअरपोर्टबाहेर बीएसएफ कॅम्पवर करण्यात आलेल्या हल्ल्यामागेही तीन फूट उंचीच्या नूर मोहम्मदचा हात असल्याचं बोललं जात आहे. या हल्ल्यात एक बीएसएफ अधिकारी शहीद झाले होते तर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.
जानेवारी 2011मध्ये दिल्लीच्या पीओटी कोर्टनं नूर मोहम्मद तंत्रेसहीत अन्य चार जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दिल्लीतील तिहार जेलमध्ये काही काळ शिक्षा भोगल्यानंतर त्याची रवानगी श्रीनगरच्या जेलमध्ये करण्यात आली. यावेळी 2015मध्ये मोहम्मदला काही दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात आले, यामध्ये जम्मू काश्मीर हाय-कोर्टानं कित्येकदा वाढदेखील केली. पॅरोलच्या जवळपास तीन महिन्यानंतर मोहम्मद अंडरग्राऊंड झाल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूर मोहम्मद तंत्रे सध्या जैश-ए-मोहम्मदमध्ये सहभागी झाला असून दहशतवादी कारवाया घडवून आणत आहे. मोहम्मद हा केवळ तीन फूट उंचीचा असल्यानं त्याला सहज ओळखता येणं शक्य आहे. त्यामुळे मोहम्मदचं कोणतीही पाऊल त्याच्यासाठी मोठी समस्या बनू शकते, असेही सांगण्यात येत आहे.