‘५जी’मुळे ‘दूरसंचार’चे महत्त्व आणखी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 02:06 AM2019-11-19T02:06:59+5:302019-11-19T02:11:31+5:30
‘५जी’च्या आगमनामुळे दूरसंचार क्षेत्राची इतर प्रमुख क्षेत्रांसोबतची ही जोडणी (कनेक्ट) आणखी मजबूत होईल, असे दूरसंचार सचिव अंशू प्रकाश यांनी सांगितले.
नवी दिल्ली : दूरसंचार क्षेत्राचा आर्थिक वृद्धी आणि रोजगार यावर थेट परिणाम होत असतो. त्याचबरोबर आरोग्य व कृषी यांसारख्या प्रमुख क्षेत्रांसाठी दूरसंचार क्षेत्र महत्त्वाचे आहे. ‘५जी’च्या आगमनामुळे दूरसंचार क्षेत्राची इतर प्रमुख क्षेत्रांसोबतची ही जोडणी (कनेक्ट) आणखी मजबूत होईल, असे दूरसंचार सचिव अंशू प्रकाश यांनी सोमवारी सांगितले.
येथे ‘आसियान-ट्राय’ कार्यक्रमात अंशू प्रकाश म्हणाले की, नागरिकांचे सबलीकरण करणे, प्रशासन अधिक गतिमान करणे आणि पारदर्शकतेत वाढ करणे यात दूरसंचार क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे. हे एक प्रमुख पायाभूत क्षेत्र आहे. त्याचा आर्थिक वृद्धी व रोजगारावर थेट परिणाम होत असतो. कारण इतर क्षेत्रे दूरसंचार क्षेत्रावरच स्वार होऊन काम करीत असतात. वित्त, कृषी, आरोग्यसेवा आणि इतरही अनेक क्षेत्रांसाठी ‘डिजिटल कनेक्टिव्हिटी’ हा एक अविभाज्य भाग आहे. ‘५जी’च्या आगमनानंतर ही कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल.
दूरसंचार नियामक ‘ट्राय’चे चेअरमन आर. एस. शर्मा यांनी सांगितले की, माहिती व दळवळण तंत्रज्ञान क्षेत्रात यंत्रणा व डाटा
सुरक्षा अधिक महत्त्वाची होत चालली आहे. अलीकडच्या काळात प्रत्येक क्षेत्र दूरसंचार क्षेत्रावर अवलंबून आहे. या क्षेत्राची कमजोरी (व्हल्नरेबिलिटी) इतर क्षेत्रांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.