भीषण रस्ते अपघातानं भोजपुरी सिनेइंडस्ट्रीत शोककळा; ४ नवोदित कलाकारांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 09:42 AM2024-02-27T09:42:45+5:302024-02-27T09:43:06+5:30
अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
बिहारमधील कैमूर येथे सोमवारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांमध्ये भोजपुरी चित्रपटसृष्टीतील चार उगवत्या कलाकारांनाही आपला जीव गमवावा लागला. बिहारच्या कैमूर जिल्ह्यात ट्रक, एसयूव्ही आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या धडकेत मृत्यू झालेल्या ९ लोकांमध्ये भोजपुरी गायक छोटू पांडे यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. याशिवाय भोजपुरी अभिनेत्री आंचल तिवारी आणि सिमरन श्रीवास्तव यांनाही या रस्ता अपघातात जीव गमवावा लागला आहे.
मोहनिया पोलीस स्टेशन हद्दीतील देवकाली गावाजवळ जीटी रोडवर रविवारी सायंकाळी ही घटना घडली. मोहनियाचे डीएसपी दिलीप कुमार यांनी सांगितले की, सोमवारी मृतांची ओळख पटली असून भोजपुरी गायक विमलेश पांडे उर्फ छोटू पांडे यांचाही त्यात समावेश आहे.आंचल तिवारी, सिमरन श्रीवास्तव, प्रकाश राम, दधिबल सिंग, अनु पांडे, शशी पांडे, सत्यप्रकाश मिश्रा आणि बागीश पांडे अशी इतर मृतांची नावे आहेत. दोन महिलांसह आठ जणांना घेऊन जाणाऱ्या वाहनाने आधी मोटारसायकलला धडक दिल्याने हा अपघात झाला असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
यानंतर, एसयूपी आणि दुचाकी दोघेही दुसऱ्या लेनमध्ये गेले, तेथे एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. तेथे मोटारसायकल चालकासह सर्व नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.