मुंबई शहरातून ४ अर्ज दाखल
By admin | Published: September 25, 2014 04:11 AM2014-09-25T04:11:14+5:302014-09-25T04:11:14+5:30
मुंबई शहरातील १० विधानसभा मतदारसंघातून बुधवारी केवळ ४ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली.
मुंबई : मुंबई शहरातील १० विधानसभा मतदारसंघातून बुधवारी केवळ ४ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली. हे चारही उमेदवार अपक्ष उमेदवार असून नोंदणीकृत पक्षाच्या एकाही उमेदवाराने अद्याप अर्ज दाखल केलेला नाही.
याआधी शनिवारी आणि सोमवारी शहरातून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नव्हता. तर मंगळवारी शिवडी विधानसभा मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे चंद्रकांत देसाई आणि मलबार हिलमधून शंकर सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. तर बुधवारी शीव-कोळीवाडा येथून प्रकाश विजयसिंह, मलबार हिलमधून शंकर सोनावणे आणि मुंबादेवीतून अब्दुल लतीफ अहमद कादीर शेख व मतीन अहमद रंगरेज या अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण उमेदवारांची संख्या ६ झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सोनवणे या अपक्ष उमेदवाराने तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान, बुधवारपर्यंत शहरातील १० विधानसभा मतदारसंघातून एकूण २७४ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. तर उपनगरातील २६ मतदारसंघातून एकूण ५०० हून अधिक विक्री झाली आहे. मात्र शहरातून केवळ ६ तर उपनगरातून १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे शेवटच्या तीन दिवसांत मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.