भुवनेश्वर एक्स्प्रेसचे ८ डबे घसरले; १५ प्रवासी जखमी तर चौघांची प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 02:29 IST2020-01-17T02:29:37+5:302020-01-17T02:29:48+5:30
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी पोलीस व अन्य मदत यंत्रणा तिथे पोहोचल्या आणि गाडीत अडकलेल्यांची त्यांनी सुटका केली.

भुवनेश्वर एक्स्प्रेसचे ८ डबे घसरले; १५ प्रवासी जखमी तर चौघांची प्रकृती चिंताजनक
भुवनेश्वर : लोकमान्य टिळक टर्मिनसहून निघालेल्या मुंबई-भुवनेश्वर एक्स्प्रेसचे आठ डबे गुरुवारी सकाळी कटकपासून १५ किलोमीटर अंतरावरील नरगुंडी स्टेशनपाशी रुळावरून घसरल्याने १५ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
ही गाडी एका मालगाडीवर आदळली आणि रुळावरून पाच डबे घसरले, असे रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले. अतिशय दाट धुक्यामुळे गाडीच्या ड्रायव्हरला मालगाडी दिसली नाही आणि हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांची नावे समजू शकली नाहीत.
जखमी ओडिशाचे आहेत की, त्यात मुंबई वा महाराष्ट्रातील कोणी आहे, हेही स्पष्ट झाले नाही. मात्र, या गाडीने प्रवास करणाऱ्यांविषयी माहिती मिळावी, यासाठी कटक तसेच मुंबईतील दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वेने व्यवस्था केली आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी पोलीस व अन्य मदत यंत्रणा तिथे पोहोचल्या आणि गाडीत अडकलेल्यांची त्यांनी सुटका केली. जखमींना लगेचच नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे रेल्वेची अॅक्सिडेंट मेडिकल व्हॅनही पाठविण्यात आली. या अपघातामुळे आठ ते नऊ दूर पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक बिघडले. त्यात भुवनेश्वरहून मुंबईला येणाºया एका गाडीचाही समावेश होता.