जम्मू काश्मीरमध्ये मारला गेला 4 फूट उंचीचा खतरनाक दहशतवादी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 03:12 PM2017-12-26T15:12:42+5:302017-12-26T16:08:00+5:30
जम्मू काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा चार फुटांची उंची असणारा मोहम्मद तंत्रे उर्फ 'छोटा नूर' या दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. पुलवामा जिल्ह्यात जवानांसोबत झालेल्या चकमकीत नूर मोहम्मद तंत्रे मारला गेला.
श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा चार फुटांची उंची असणारा मोहम्मद तंत्रे उर्फ 'छोटा नूर' या दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. पुलवामा जिल्ह्यात जवानांसोबत झालेल्या चकमकीत नूर मोहम्मद तंत्रे मारला गेला. गेल्या सहा महिन्यांपासून नूर मोहम्मद तंत्रेने भारतीय लष्कराच्या जवानांनी झोप उडवली होती. अखेर त्याचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश मिळालं आहे. नूर मोहम्मद तंत्रेचा खात्मा होणे भारतीय लष्करासाठी मोठं यश असल्याचं मानलं जात आहे. दक्षिण आणि मध्य काश्मीरमधील दहशतवादी कारवायांसाठी नूर मोहम्मद तंत्रे जबाबदार होता. तो ठार झाल्याने दहशतवादी संघटनेला मोठा धक्का बसला असल्याचं सांगितलं जात आहे. नूर मोहम्मद आपल्या साथीदारांसोबत श्रीनगर - जम्मू हायवेवर पथकावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच जवानांना त्याला ठार करत यश मिळवलं आहे.
जम्मू काश्मीरमधील हा चार फूट उंचीचा दहशतवादी मोठी समस्या बनला होता. गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी कारवायांमागे 'जैश-ए- मोहम्मद'चा नूर मोहम्मद तंत्रेचा हात असल्याचे माहिती समोर आली होती. पुलवामा जिल्ह्यातील त्रालच्या नूर मोहम्मदनं दक्षिण काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदची कमान सांभाळली होती. तंत्रेला 2003मध्ये दिल्लीतून अटक करण्यात आली होती आणि पीओटीए कोर्टानं त्याला 2011मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यादरम्यान मिळालेल्या पॅरोलवर नूर मोहम्मदनं पळ काढला आणि पुन्हा तो दहशतवादी संघटना जैश-ए- मोहम्मदमध्ये सहभागी झाला.
''नूर मोहम्मद तंत्रे यावेळी जैश-ए-मोहम्मदमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. काश्मीरमध्ये घडणा-या दहशतवादी घटनांमागे नूर मोहम्मद आणि कमांडर मुफ्ती वकासची प्रमुख भूमिका आहे', अशी माहिती त्यावेळी पोलिसांनी दिली होती.
तंत्रेनं जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचे समर्थन केले होते ज्यांनी ऑगस्ट महिन्यात पुलवामा जिल्ह्यात पोलीस लाईनवर हल्ला केला होता. ऑगस्ट महिन्यात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात 8 सुरक्षा रक्षक शहीद झाले होते तर यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. याशिवाय, 3 ऑक्टोबरला श्रीनगर इंटरनॅशनल एअरपोर्टबाहेर बीएसएफ कॅम्पवर करण्यात आलेल्या हल्ल्यामागेही नूर मोहम्मदचा हात असल्याचं बोललं जात होतं. या हल्ल्यात एक बीएसएफ अधिकारी शहीद झाला होता तर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.
जानेवारी 2011मध्ये दिल्लीच्या पीओटी कोर्टनं नूर मोहम्मद तंत्रेसहीत अन्य चार जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दिल्लीतील तिहार जेलमध्ये काही काळ शिक्षा भोगल्यानंतर त्याची रवानगी श्रीनगरच्या जेलमध्ये करण्यात आली. यावेळी 2015मध्ये मोहम्मदला काही दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात आले, यामध्ये जम्मू काश्मीर हाय-कोर्टानं कित्येकदा वाढदेखील केली. पॅरोलच्या जवळपास तीन महिन्यानंतर मोहम्मद अंडरग्राऊंड झाल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून 'ऑपरेशन ऑल आउट' सुरू करण्यात आले असून या अंतर्गत 203 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गेल्या 3 वर्षांतील ही आकडेवारी सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 2017मध्ये जम्मू काश्मीरमध्ये 10 डिसेंबरपर्यंत 203 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे तर 2016 मध्ये 148 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता व 2015 मध्ये 108 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.