झारखंडमध्ये जमिनीखाली सोन्याचे 4 भांडार, जीएसआय प्रयोगशाळेत तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 10:26 AM2020-06-22T10:26:29+5:302020-06-22T10:27:03+5:30
झारखंडमध्ये पहिल्यांदा सिमडेगा जिल्ह्यात सोन्याचे भंडार असल्याचे सकेत मिळाले होते. येथील सिमडेगाच्या करकई प्रदेशातील सागजोग बागबेडा गावाजवळ हे भंडार आहे
रांची - झारखंड राज्यात सोन्याच्या नवीन 4 खाणी असल्याचे संकेत मिळाले आहेत. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण ( जीएसआय) प्रयोगशाळेतील प्राथमिक तपासणीनंतर या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या भूतात्विक कार्यक्रम परिषदेनेही जीएसआयच्या अहवालास हिरवा कंदील दर्शवला आहे. त्यामुळे, आता येथील जमिनीच्या पृष्ठभागात खोदकाम करुन सोन्याचं भंडार शोधण्यासाठी संशोधन करण्यात येईल. त्यावरुन, या चारही भागात किती सोनं दडलंय याचा अंदाज लावता येणार आहे.
झारखंडमध्ये पहिल्यांदा सिमडेगा जिल्ह्यात सोन्याचे भंडार असल्याचे सकेत मिळाले होते. येथील सिमडेगाच्या करकई प्रदेशातील सागजोग बागबेडा गावाजवळ हे भंडार आहे. जीएसआयच्या ताज्या सर्वेक्षणानुसार जमशेदपूरच्या कोकपाडा आणि चिरुगोडा येथेही सोनं आढळून येण्याचे संकेत मिळाले आहेत. कोकपाडा हे धालभूमगढ प्रदेशात आहे, तर चिरुगोडा गम्हरिया प्रदेशात आहे. सरायकेला-खरसावांच्या बच्चनकोचा आणि हलेन रघुनाथपूर गावाजवळही सोनं सापडण्याची शक्यता आहे. हे गाव निमहीड प्रदेशात येते.
केंद्र सरकारकडून जीएसआयला परवानगी मिळाल्यानंतर येथील सोन्याच्या खाणीचं संशोधन करण्यात येईल. कुठल्या रासायनिक प्रकियेद्वारे येथून शुद्ध प्रतीचे सोनं प्राप्त होईल, हेही जीएसआयने सांगणं आवश्यक आहे. या चारही ठिकाणी उत्कृष्ट गुणवत्तेचं सोनं भेटेल, असा अंदाज जीएसआयने व्यक्त केला आहे.