शुद्धिकरणासाठी तिरुपती मंदिरात ४ तास होमहवन; पावित्र्य पुन्हा बहाल करण्याचा उद्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 12:24 PM2024-09-24T12:24:02+5:302024-09-24T12:24:10+5:30
मंदिराचे शुद्धीकरण करण्यासाठी सोमवारी चार तासांचे शांती होम पंचगव्य प्राक्षण
तिरुपती : वायएसआर काँग्रेसच्या कारकिर्दीत प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी आढळल्याचा अहवाल एका प्रयोगशाळेने दिल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तिरुपती मंदिराचे शुद्धीकरण करण्यासाठी सोमवारी चार तासांचे शांती होम पंचगव्य प्राक्षण करण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.
होमहवन पहाटे ६ वाजता सुरू झाले आणि १० पर्यंत चालले. भगवान व्यंकटेश्वर यांचे पावित्र्य पुन्हा बहाल करण्याच्या उद्देशाने आणि भाविकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी हा विधी करण्यात आला. या विधींमुळे लाडू प्रसादाचे पावित्र्य पुनर्संचयित होईल, असा विश्वास टीटीडी कार्यकारी अधिकारी जे. श्यामल राव यांनी व्यक्त केला.
‘एफएसएसआय’च्या अहवालाची प्रतीक्षा
एफएसएसआय अहवाल आल्यानंतर तिरुपती मंदिरातील तुपाच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त उपाय करता येईल, अन्न सुरक्षेची जबाबदारी एफएसएसआयकडे असते, असे ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव निधी खरे यांनी सोमवारी सांगितले.