४ मुले आणि पत्नीसाठी किती संपत्ती सोडून गेला अतीक अहमद?; आकडे पाहून डोळे फिरतील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 03:42 PM2023-04-18T15:42:49+5:302023-04-18T15:47:04+5:30
अतीक अहमदची दहशत सर्वसामान्यांच्या मनात होती. अतीकचा खात्मा झाला मात्र त्याची संपत्ती किती याबाबत आता उघडपणे माहिती समोर येत आहे.
लखनौ - उत्तर प्रदेशातील माफिया अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफची हत्या झाली आहे. अतीकच्या ५ मुलांपैकी एक असदचाही एन्काऊंटर झाला आहे. तर अतीकचे २ मुले जेलमध्ये तर उर्वरित २ मुले अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधार गृहात ठेवले आहे. अतीकची पत्नी शाइस्ता परवीन हीदेखील उमेश पाल हत्याकांडातील आरोपी आहे. शाइस्ता अद्याप फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
अतीक अहमदची दहशत सर्वसामान्यांच्या मनात होती. अतीकचा खात्मा झाला मात्र त्याची संपत्ती किती याबाबत आता उघडपणे माहिती समोर येत आहे. कायदेशीररित्या त्याच्याकडे किती मालमत्ता आहे. आतापर्यंत अतीकच्या बेनामी संपत्तीचा खुलासा झाला आहे. त्याच्याकडे किती मालमत्ता आहे हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत.
अतीकने कायदेशीररित्या किती मालमत्ता जाहीर केली?
२०१९ च्या लोकसभेत अतीक अहमद याने वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्याला ८३३ मते मिळाली. त्यावेळी त्याला प्रयागराजच्या नैनी मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. अतीकने निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्तेची संपूर्ण माहिती दिली होती. त्यानुसार त्याच्याकडे २७ कोटी ५० लाख रुपयांपेक्षा जास्त संपत्ती होती. आठवी पास अतीककडे दोन कोटी ८७ लाखांहून अधिक जंगम मालमत्ता होती, तर २४ कोटी ९९ लाखांहून अधिक किमतीची स्थावर मालमत्ता नोंदवण्यात आली होती.
अतीकच्या नावावर महागडी वाहने, चार रायफल आणि पिस्तुल नोंदवले होते. अतीकची पत्नी शाइस्ता परवीन हिच्याकडे ५० लाखांहून अधिक किमतीचे दागिने आहेत. याशिवाय प्रयागराज ते दिल्ली आणि ग्रेटर नोएडापर्यंत अतीकच्या नावावर प्लॉट, फ्लॅट, बंगले आणि शेतजमीन आहे.
आता बेनामी संपत्तीबद्दलही जाणून घ्या
बेनामी मालमत्तेबाबत वेगवेगळे दावे केले जातात. अलीकडेच, ईडीने अतीकच्या जवळच्या मित्रांच्या आणि त्याच्या ओळखीच्या लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकले. आतापर्यंत समोर आलेल्या आकड्यांनुसार, अतीक याच्याकडे पाच हजार कोटी रुपयांहून अधिकची बेनामी संपत्ती आहे. त्याचबरोबर काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात आहे की, अतीककडे १५ हजार कोटींहून अधिकची बेनामी संपत्ती आहे.
अतीकचे बिल्डरसोबतच्या चॅट व्हायरल
साबरमती कारागृहात असताना अतीक अहमदने एका बिल्डरला धमकीही दिली होती. आता त्याचे चॅटही व्हायरल होत आहेत. यामध्ये अतीकने बिल्डरकडे ५ कोटी रुपये मागितले होते. त्याची मुले उमर आणि असद यांचा हिशोब द्या, असे अतीकने म्हटले होते. अतीकच्या सांगण्यावरून बिल्डरने मुलगा असद याला ८० लाख रुपयेही दिले होते, असे सांगितले जाते.