४ भारतीय शिक्षकांचे इसिसकडून अपहरण

By admin | Published: August 1, 2015 02:21 AM2015-08-01T02:21:48+5:302015-08-01T02:21:48+5:30

त्रिपोली व ट्युनिस येथून मायदेशी परतत असलेल्या ४ भारतीय शिक्षकांचे लिबियात कथितरीत्या इस्लामिक स्टेटने (इसिस) अपहरण केले होते. या चार नागरिकांपैकी दोघांची सुटका करण्यात आली आहे.

4 kidnapping of Indian teachers by Isis | ४ भारतीय शिक्षकांचे इसिसकडून अपहरण

४ भारतीय शिक्षकांचे इसिसकडून अपहरण

Next

नवी दिल्ली : त्रिपोली व ट्युनिस येथून मायदेशी परतत असलेल्या ४ भारतीय शिक्षकांचे लिबियात कथितरीत्या इस्लामिक स्टेटने (इसिस) अपहरण केले होते. या चार नागरिकांपैकी दोघांची सुटका करण्यात आली आहे. या चौघांपैकी दोघे हैदराबादचे, तर एक रायचूर आणि दुसरा बंगळुरूचा आहे. सुटका झालेल्या दोन भारतीयांची नावे लक्ष्मीकांत व विजयकुमार अशी आहेत. राहिलेल्या दोघांची सुटका करण्याचे प्रयत्न चालू आहेत असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी टिष्ट्वटरवर टाकलेल्या पोस्टनुसार अपहरण झालेल्या दोन भारतीयांची सुटका झाली आहे. सुटका झालेले भारतीय लिबियातील सिर्ते विद्यापीठात सुरक्षितपणे परत आले आहेत,असेही स्वरूप यांनी म्हटले आहे. पण ही सुटका कशी झाली हे लगेच कळले नव्हते. सकाळी सुषमा स्वराज यांनी या घटनेची माहिती तसेच योजले जाणारे उपाय याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले होते. सिर्ते येथून ५० कि.मी.वर असलेल्या तपासणी चौकीवर या चौघांना ताब्यात घेण्यात आले. हा परिसर इस्लामिक स्टेटच्या ताब्यात आहे. यातील तिघे हे सिर्ते विद्यापीठात प्राध्यापक असून चौथा याच विद्यापीठाच्या जुफ्रा येथील शाखेत कार्यरत आहे. आम्ही पीडित कुटुंबियांच्या नियमित संपर्कात असून अपहृतांच्या सुखरूप सुटकेकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत, असे स्वरूप यांनी सांगितले. या नागरिकांच्या सुटके करीता खंडणीची मागणी करण्यात आलेली नाही. दोन दिवसांपूर्वी २९ जुलै रोजी रात्री ११ वाजता त्रिपोली येथील आमच्या दूतावासाला मायदेशी परतत असलेल्या चार भारतीयांना तपासणी चौकीवर पकडण्यात आल्याची माहिती मिळाली. परराष्ट्र मंत्रालय त्रिपोलीतील आपल्या दूतावासाद्वारे या घटनेसंदर्भातील माहितीची खातरजमा करीत आहे. ज्या भागात या भारतीयांचे अपहरण झाले तो भाग इस्लामिक स्टेटच्या ताब्यात आहे. इस्लामिक स्टेटने इराक आणि सिरियातील मोठा भूभाग आपल्या कब्जात घेत स्वत:चे खलिफा साम्राज्य घोषित केले. याची गंभीर दखल घेत भारत सरकारने गेल्या वर्षी जुलै महिन्यात संघर्षग्रस्त लिबियातील भारतीयांना तात्काळ तेथून बाहेर पडण्यास सांगितले होते. इराकमध्ये बेपत्ता असलेल्या ३९ भारतीयांचा अद्याप ठावठिकाणा नाही.(वृत्तसंस्था)

 

Web Title: 4 kidnapping of Indian teachers by Isis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.