मुलीच्या लग्नासाठी ठेवलेली 4 लाखांची रक्कम अन् दागिने आगीत जळून खाक, तरुणी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 04:26 PM2023-03-05T16:26:31+5:302023-03-05T16:26:53+5:30
बिहारच्या गया येथे घराला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे.
नवी दिल्ली : बिहारच्या गया जिल्ह्यातील टिकारी पोलीस स्टेशन हद्दीतील नारायण विघा येथील एका घरात शनिवारी संध्याकाळी गॅस सिलिंडर लिक झाल्यामुळे भीषण आग लागली. या अपघातात एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. याशिवाय घरात ठेवलेले साडेचार लाख रुपये, अर्धा किलो चांदीचे दागिने, सोन्याचे दागिने, धान्य, फर्निचर व घरात ठेवलेले इतर सर्व सामान जळून खाक झाले.
दरम्यान, आगीत जळून खाक झालेली सर्व संपत्ती जमीन विकून मुलीच्या लग्नासाठी व घर बांधण्यासाठी जमा करून ठेवली होती. या घटनेत तरूणी पुष्पा कुमारी ही गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
विघा गावातील ग्रामस्थ आशिष कुमार यांच्या मुलीचे लग्न होणार असल्याचे सांगितले जात आहे. घरात पैसे, दागिने व इतर लग्नाचे साहित्य ठेवले होते. स्वयंपाक करताना गॅस सिलिंडर लिक झाल्यामुळे शनिवारी रात्री घरात आग लागली. काही वेळातच आगीने संपूर्ण घराला वेढले आणि मोठे आर्थिक नुकसान केले.
आगीत मोठे नुकसान
घरातील लोकांनी आपला जीव वाचवला. सिलिंडरचा स्फोट होण्याची भीती असल्याने आग आटोक्यात आणण्याचे धाडस कोणीच केले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत संपूर्ण घराला आग लागली आणि सर्व सामान जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या पथकाने अथक परिश्रमाने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.
चार लाख रुपये प्लास्टिकच्या डब्ब्यात ठेवले होते
या घटनेत घरातील 10 क्विंटल तांदूळ, 3 क्विंटल गहू, 1 क्विंटल डाळी आणि घरातील सर्व फर्निचर जळून खाक झाल्याचे पीडित आशिष कुमार यांनी सांगितले. तसेच बहिणीच्या लग्नासाठी आणि घराच्या बांधकामासाठी जमा केलेले साडेचार लाख रुपयेही जळून खाक झाले. खरं तर आशिष यांनी पैसे प्लास्टिकच्या डब्ब्यात ठेवले होते. या घटनेची माहिती पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"