रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; जेवण करण्यासाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, चहाची किंमत तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 10:56 AM2019-11-15T10:56:09+5:302019-11-15T10:57:42+5:30
तिकीट सिस्टिममध्ये हे नवीन दर १५ दिवसांत अपडेट होतील. पुढील ४ महिन्यांनंतर हे नवे दर लागू होणार आहे.
मुंबई - रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण रेल्वेत चहा, नाश्ता आणि जेवण करण्यासाठी प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. रेल्वे बोर्डाने याबाबत एक परिपत्रक काढलं आहे ज्यात राजधानी शताब्दी आणि दुरांतो एक्सप्रेसमधील चहा, नाश्ता आणि जेवणाचे दर वाढविण्यात आले आहेत. या ट्रेनमध्ये तिकीट घेताना चहा, नाश्ता आणि जेवणाचे पैसेही द्यावे लागतात.
राजधानी, दुरांतो आणि शताब्दी ट्रेनमध्ये लागू करण्यात आलेले नवीन दर सेकंड क्लासमधील प्रवाशांसाठी चहा १० रुपयांऐवजी २० रुपये, स्लीपर क्लास १५ रुपये, दुरांतो एक्सप्रेस स्लीपर क्लासमध्ये पूर्वी नाश्ता आणि जेवण ८० रुपयांना मिळत होतं. ते आता १२० रुपये झालं आहे. तर संध्याकाळचा चहा २० रुपयांऐवजी ५० रुपये होणार आहे.
तिकीट सिस्टिममध्ये हे नवीन दर १५ दिवसांत अपडेट होतील. पुढील ४ महिन्यांनंतर हे नवे दर लागू होणार आहे. राजधानी एक्सप्रेस फर्स्ट क्लासमध्ये पूर्वी जेवण १४५ रुपयांना होतं त्याचे नवीन दर २४५ रुपये असणार आहेत. त्यामुळे या नवीन दराचा फटका सर्वसामान्यांना होणार आहे. तसेच याव्यतिरिक्त असणाऱ्या एक्सप्रेस, मेलमध्ये शाकाहारी जेवण पूर्वी ५० रुपयांना मिळत होतं त्यासाठी आता ८० रुपये मोजावे लागणार आहेत. इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनने एग्ज बिरयानी ९० रुपये, चिकन बिरयानी ११० रुपये मोजावे लागणार आहेत.
सकाळच्या चहापेक्षा संध्याकाळचा चहा जास्त महाग का? यावर एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, संध्याकाळच्या चहासोबत रोस्टेड नट्स, स्नॅक्स आणि मिठाई हेदेखील दिलं जातं. आमची रेल्वे कॅटरिंग सेवा आणखी सुधारणार आहे. त्यासाठी हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. २०१४ मध्ये हे दर बदलण्यात आले होते. आयआरसीटीसीचा आग्रह आणि बोर्डाच्या शिफारशीनंतर या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रवास करताना जास्तीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. याबाबत प्रवाशांमध्ये नाराजी असल्याचंही दिसून येत आहे.