प्रद्युम्न हत्येत आणखी ४ विद्यार्थी सहभागी? सीबीआयला संशय; चौकशीची सूत्रे त्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:55 PM2017-11-11T23:55:01+5:302017-11-11T23:55:40+5:30
गुरगावच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी अकरावीतील विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयने आपला तपास इतर विद्यार्थ्यांच्या दिशेने वळवला आहे. या हत्येत इतर विद्यार्थीही सहभागी असावेत, असा संशय आहे.
नवी दिल्ली : गुरगावच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी अकरावीतील विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयने आपला तपास इतर विद्यार्थ्यांच्या दिशेने वळवला आहे. या हत्येत इतर विद्यार्थीही सहभागी असावेत, असा संशय आहे. आणखी चार विद्यार्थ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता असली तरी अधिकारी आताच याविषयी बोलण्यास तयार नाहीत. चारपैकी एका विद्यार्थ्याची चौकशीही झाली आहे.
शुक्रवारी रायन स्कूलच्या माजी कर्मचा-यांचीही चौकशी झाली. पोलिसांना एक चाकू हस्तगत केला असून, तो तपासातील मुख्य पुरावा ठरू शकेल. प्रद्युम्नच्या हत्येनंतर शाळा प्रशासन व आरोपी विद्यार्थ्याचे नातेवाईक यांनी पोलिसांशी संगनमत करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला का, याचाही सीबीआय तपास करीत आहे.
कंडक्टरला सोडणार?
या प्रकरणी अटक झालेल्या कंडक्टर अशोककुमारची सुटका होण्याची शक्यता आहे. तपास सुरू असताना त्याची पुन्हा चौकशी होऊ शकते. मात्र त्याच्या जामिनाला सीबीआय विरोध करणार नसल्याचे समजते. त्याच्या जामिनाला विरोध करण्यासाठी सीबीआयकडे कारण नसल्याचे सांगण्यात आले. ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यानेच एका दुकानातून चाकू खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
माझ्या मुलाचे आयुष्य वाचवले
गुरूग्राम : कंडक्टरची आई केलादेवी यांनी प्रद्युम्नच्या वडिलांचे सांत्वन करतानाच त्यांचे आभारही मानले आहेत. वरुण ठाकूर यांनी आपला मुलगा प्रद्युम्न गमावला. पण न्यायासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच माझा मुलगा तुरुंगातून निर्दोष बाहेर पडल्याचे मला पाहायला मिळणार आहे.