छत्तीसगडमध्ये ४ नक्षलवादी ठार; पोलीस शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 02:30 AM2020-05-10T02:30:19+5:302020-05-10T02:30:43+5:30
राजनांदगाव जिल्ह्यातील मानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ही घटना घटली.
रायपूर : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त राजनांदगाव जिल्ह्यात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या चकमकीत एक पोलीस अधिकारी शहीद झाला आहे.
छत्तीसगडच्या दुर्ग विभागाचे पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी शनिवारी सांगितले की, राजनांदगाव जिल्ह्यातील मानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ही घटना घटली. मदनवाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी तथा पोलीस उपनिरीक्षक श्याम किशोर शर्मा चकमकीत शहीद झाले.
पथक मानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परदौनी गावाच्या जंगलातून जात असताना नक्षलवाद्यांशी गाठ पडली. नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर अचानक गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाने त्यास चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी सुमारे २० मिनिटे गोळीबार झाल्यानंतर नक्षलवादी पळून गेले. नंतर घटनास्थळाची तपासणी करण्यात आली तेव्हा दोन महिलांसह चार नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. अशोक रैनू (३५), कृष्णा नरेती (२६), सविता सलामे आणि प्रमिला अशी मृत नक्षलवाद्यांची नावे आहेत.