कुंभमेळ्यातून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; क्षणातच संपूर्ण कुटुंब संपलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 16:19 IST2025-01-27T16:18:38+5:302025-01-27T16:19:19+5:30
या अपघातामुळे कार आणि ट्रक दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने हटवली

कुंभमेळ्यातून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; क्षणातच संपूर्ण कुटुंब संपलं
आग्राच्या फतेहाबादमध्ये लखनौ एक्सप्रेसवर सोमवारी सकाळी भीषण अपघात घडला. कुंभवरून स्नान करून परतणाऱ्या हायकोर्टाच्या वकिलाचा अपघातात बळी गेला. कारवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकाला धडकली आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती ज्यात कारमधील एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
दिल्लीत राहणारं कुटुंब
पोलिसांनी कारमध्ये अडकलेल्य पती-पत्नीसह मुलगा, मुलीचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर ते पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आले. दिल्लीच्या उत्तम नगर भागात ओमप्रकाश आर्या हे दिल्ली हायकोर्टात वकील होते. ते त्यांच्या हुंडई कारने कुटुंबासह प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी गेले होते. कुंभ मेळ्याजवळ पवित्र स्नान करून पत्नी पूर्णिमा सिंह, १२ वर्षीय मुलगी अहाना, ४ वर्ष मुलगा विनायक पुन्हा दिल्लीच्या दिशेने येत होते. त्याचवेळी आग्रा लखनौ एक्सप्रेस वेवर ३१ किमी कार पोहचली असता तिथे अपघात झाला.
भयंकर दुर्घटना, चौघांचा जागीच मृत्यू
कारवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकाला आदळली आणि समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या अपघातात कारमध्ये बसलेले संपूर्ण कुटुंब संपलं. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबली होती. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी सर्व मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवून तपासाला सुरुवात केली.
दरम्यान, या अपघातामुळे कार आणि ट्रक दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने हटवली आणि मृत कुटुंबाच्या नातेवाईकांना माहिती दिली.