Spicejet च्या वैमानिकांना क्रोएशियामध्ये विमानातच घालवावे लागले 21 तास, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 05:42 PM2021-05-15T17:42:25+5:302021-05-15T17:44:06+5:30
Spicejet : या वैमानिकांमध्ये दोन कमांडर आणि दोन फर्स्ट ऑफिसर यांचा समावेश आहे. मंगळवारी जागरेब येथे जवळपास 21 तास बोईंग 737 विमानात घालवल्यानंतर हे वैमानिक दिल्लीला परतले.
नवी दिल्ली : स्पाइसजेट (Spicejet) या खासगी विमान कंपनीच्या चार वैमानिकांना क्रोएशियन राजधानी जागरेबमध्ये संपूर्ण दिवस विमानातच घालावा लागला. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे कोरोनाचा आरटी-पीसीआर (RT-PCR) रिपोर्ट नव्हता. स्पाइसजेटने अनिवार्य असलेली त्यांची प्री-फ्लाइट आरटी-पीसीआर टेस्ट केली नव्हती. कोरोनाच्या निगेटिव्ह रिपोर्टशिवाय ते क्रोएशियाला पोहोचले, त्यामुळे तेथे त्यांना विमानातून उतरण्याची परवानगी देण्यात आली नाही. यामुळे वैमानिकांना विमानातच सुमारे 21 तास घालवावे लागले. (No Rt-Pcr Report: 4 Spicejet Pilots Spend Almost A Day Inside Aircraft In Croatia Before Flying Back To Delhi)
या वैमानिकांमध्ये दोन कमांडर आणि दोन फर्स्ट ऑफिसर यांचा समावेश आहे. मंगळवारी जागरेब येथे जवळपास 21 तास बोईंग 737 विमानात घालवल्यानंतर हे वैमानिक दिल्लीला परतले. परतलेल्या विमानात कोणतेही प्रवासी किंवा सामान नव्हते. नागरी उड्डयन संचालनालयाने (DGCA)स्पाइसजेटला या घटनेबद्दल फटकारले आहे.
दिल्लीहून उड्डाण करण्यापूर्वी क्रोएशियाच्या अधिकाऱ्यांकडून ईमेल आला होता की, आरटी-पीसीआर वैमानिकांसाठी आवश्यक नाही. विमानाने जागरेब पोहोचल्यानंतर कर्माचाऱ्यांना सांगितले की, निर्देश बदलले आहेत. भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता सर्वांना आरटी-पीसीआर टेस्ट आवश्यक करण्यात आली आहे. आमच्यासाठीसुद्धा हे आश्चर्यकारक होते, असे स्पाइसजेटच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले.
(डॉक्टर म्हणाले, 'मी माघार घेऊ शकत नाही, मला देशाला वाचवायचे आहे', तीन दिवसानंतर मृत्यू)
फ्लाइट ड्युटी वेळेवर बंधने आल्याने वैमानिक ताबडतोब परत येऊ शकले नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना विमानातील सर्व सुविधा पुरविल्या गेल्या आणि विमानाची साफ-सफाई केली. डीजीसीएकडून परवानगी घेण्यात आली. वैमानिकांनी विमानात 21 तास विश्रांती घेतली आणि त्यानंतर ते दिल्लीकडे रवाना झाले. सर्व वैमानिकांचे म्हणणे आहे की, विमानात केलेल्या व्यवस्थेमुळे ते आनंदी होते. दरम्यान, 11 मे रोजी स्पाइसजेटने दिल्ली-तिबलिसी-जागरेबवर उड्डाण क्रमांक एसजी-9035 चालविले आणि त्यात 4 वैमानिक होते.
प्रवाशांविना उड्डाण
आरटी-पीसीआर रिपोर्ट नसल्यामुळे क्रोएशियाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना विमानातून खाली उतरू दिले नाही. नियमानुसार वैमानिकांसाठी दोन उड्डाणादरम्यान 21 तास विश्रांती घेणे आवश्यक आहे. परंतु या घटनेमुळे वैमानिकांसाठी परिस्थिती सोयीची नव्हती. त्यामुळे स्पाइसजेटने जागरेब ते दिल्ली उड्डाण करण्यासाठी डीजीसीएकडून मान्यता मिळविली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, डीजीसीएने स्पाइसजेटला प्रवाशांविना उड्डाण करण्यास सांगितले होते.