भारतात आयएसआय एजंटसह चार दहशतवादी घुसले; देशात हाय अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 09:04 AM2019-08-20T09:04:30+5:302019-08-20T09:10:27+5:30
भारतामध्ये पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हसेज इंटेलिजेंसच्या (आयएसआय) एका एजंटसह चार दहशतवादी शिरल्याची माहिती समोर आली आहे.
जयपूर - भारतामध्येपाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हसेज इंटेलिजेंसच्या (आयएसआय) एका एजंटसह चार दहशतवादी शिरल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान आणि गुजरात बॉर्डरसह संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अफगाणिस्तानी पासपोर्टच्या मदतीने हे चार दहशतवादीभारतात शिरल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सिरोही, राजस्थानच्या पोलीस अधीक्षक कल्याणमल मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएसआयच्या एका एजंटसह चार दहशतवादी भारतीय सीमेत घुसले आहेत. दहशतवादी कोणत्याही क्षणी घातपात घडवू शकतात. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात याबाबतचे एक पत्र पाठवण्यात आले आहे. पत्र मिळाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गर्दीची ठिकाणं, हॉटेल्स, ढाबा, रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांची तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच संशयित वाहनं आणि संशयित व्यक्तींवरही नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Rajasthan: Countrywide alert sounded after group of 4 along ISI agent enter India
— ANI Digital (@ani_digital) August 19, 2019
Read @ANI story | https://t.co/wAuWgJ91XBpic.twitter.com/Zys1OofPOn
गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवत याआधी 9 ऑगस्ट रोजी हाय अलर्ट दिला होता. यामध्ये पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत समर्थन मिळणारे दहशतवाद्यांचे गट जम्मू काश्मीर आणि अन्य ठिकाणी दहशतवादी कारवाया करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याच्या घटना घडल्या आहेत.
जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानकडून भारतामध्ये कुरापती करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. काश्मीर खोऱ्यातील शांतता बिघडविण्यासाठी पाकचे दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सरकारला प्राप्त झाली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल आणि सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. काश्मीरमधील घडामोडींनंतर मुंबईसह देशातील 15 मोठ्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर गणेश चतुर्थी व आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता मुंबई पोलिसांसह सर्व तपास यंत्रणांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांसह राज्य दहशतवादविरोधी पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथके, श्वान पथके, शिघ्रकृती दल, फोर्स वन यांच्याकडून शहरात जागोजागी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील मुख्य प्रवेशद्वारांसह महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करत पोलिसांनी संशयित व्यक्ती, वस्तू, सामान, वाहने यांची कसून तपासणी सुरू केली आहे.