काश्मिरात चकमकीत ४ दहशतवादी ठार; मृतांमधील एक जण पाकिस्तानी नागरिक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 01:18 AM2020-10-11T01:18:22+5:302020-10-11T01:18:39+5:30
रायफली, पिस्तूल, दारूगोळा जप्त
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी पहाटे कुलगाम व पुलवामा येथे सुरक्षा दलाबरोबर झालेल्या दोन स्वतंत्र चकमकीत चार दहशतवादी ठार झाले आहेत. मृतांमध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे.
कुलगाम जिल्ह्यातील चिंगाम गावात दहशतवादी लपलेले आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी या परिसराची नाकेबंदी केली. त्यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. तारीक अहमद मीर, समीरभाई उर्फ उस्मान अशी त्यांची नावे असून ते जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे दहशतवादी आहे. त्यातील समीरभाई हा पाकिस्तानी दहशतवादी आहे. त्यांच्याकडून एम फोर रायफल व पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. पुलवामा जिल्ह्यातील दादोरा भागात शनिवारी पहाटे झालेल्या एका चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून दोन एके रायफली जप्त करण्यात आल्या आहेत.
काश्मीरमधील केरन क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून दोन ते तीन माणसे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होती. सुरक्षा दलाने त्यांचा डाव हाणून पाडला. ही माणसे हातातले सामान टाकून पळून गेली. त्या सामानात असलेला चार रायफलींसह मोठा शस्त्रसाठा सुरक्षा दलाने जप्त केला आहे. शस्त्रांची तस्करी करण्याचा हा प्रकार होता.
पाकिस्तानचा भारतीय वस्त्यांवर मारा
जम्मू-काश्मीरमधील दोन क्षेत्रामध्ये शनिवारी पहाटे पाकिस्तानी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय वस्त्यांवर तोफगोळ्यांचा जोरदार मारा केला. त्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या माऱ्यात पूंछ क्षेत्रातील हमीदाबी नावाची एक महिला जखमी झाली आहे.
पूंछ जिल्ह्यातील मकोटे भागात सीमेजवळ असलेल्या भारतीय वस्त्यांवर पाकिस्तानच्या लष्कराने मारा केला. कठुआ जिल्ह्यातील हिरानगर येथे आंतरराष्ट्रीय सीमेवरही पाकिस्तानी सैन्याने नागरी वस्त्यांवर तोफगोळ्यांचा मारा केला. सुदैवाने त्यामध्ये मोठी हानी झालेली नाही. पाकिस्तानने हा मारा शनिवारी पहाटे साडेचार वाजता बंद केला.