सिंगापूरमध्ये तस्करीचे ९ टन हस्तीदंत जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 04:14 AM2019-07-24T04:14:09+5:302019-07-24T04:14:14+5:30
लाकडाच्या नावाने वाहतूक : पँगोलिनचे खवलेही केले हस्तगत
सिंगापूर : सिंगापूरच्या कस्टम्स अधिकाऱ्यांनी बंदरातील एका कंटेनरमधून तस्करीचे ८.८ टन हस्तीदंत जप्त केले. सुमारे ३०० आफ्रिकन हत्ती मारून चोरट्यांनी हे हस्तीदंत काढले असावेत, असा अंदाज असून त्याची किंमत १२.९ दशलक्ष डॉलर आहे. गेल्या सुमारे ९० वर्षांत सिंगापूरमध्ये पकडलेली ही सर्वात मोठी हस्तीदंताची तस्करी आहे.
जलवाहतुकीने एकीकडून आलेला माल दुसरीकडे पाठविण्याचे (ट्रान्स शिपमेंट) सिंगापूर बंदर हे मोठे केंद्र आहे. ज्या कंटेरनरमधून हे हस्तीदंत पकडले तो आफ्रिकेतील काँगो प्रजासत्ताकातून व्हिएतनाममध्ये जाणार होता. कागदोपत्री या कंटेनरमध्ये इमारती लाकूड असल्याची नोंद करण्यात आली होती. याच कंटेनरमधून पँगोलिन (खवले मांजर) या विनष्टतेच्या मार्गावर असलेल्या सस्तन प्राण्याचे ११.९ टन खवलेही जप्त केले गेले. त्यांची किंमत ३५.७ दशलक्ष डॉलर असून, किमान दोन हजार पँगोलिनची हत्या करून हे खवले काढले असावेत, असा अंदाज आहे. गेल्या तीन महिन्यांत मिळून सिंगापूरमध्ये पँगोलिनच्या ३७.५ टन खवल्यांची तस्करी पकडण्यात आली असून, त्यांची एकूण किंमत ११२ दशलक्ष डॉलर आहे.
अवैध शिकार प्रचंड
यावरून आफ्रिकेत हत्ती व पँगोलिनची किती मोठ्या प्रमाणावर अवैध शिकार होते हे स्पष्ट होते. पँगोलिनचे मांस अतिशय स्वादिष्ट असल्याने त्यासाठी त्यांची अवैध शिकार केली जाते.
पँगोलिनचे खवले औषधी मानले जात असल्याने खास करून आग्नेय आशियाई देशांत त्यांचा मोठा चोरटा व्यापार चालतो.