मोदी सरकारच्या 4 वर्षांमध्ये दहशतवाद थांबला नाहीच, हुतात्म्यांच्या संख्येत वाढ झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 01:11 PM2018-05-25T13:11:50+5:302018-05-25T15:20:28+5:30
जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या असल्या तरी बुरहान वाणी गँगचे उच्चाटन करण्यात सरकारला यश आले आहे.
नवी दिल्ली- 2014 साली प्रत्येक प्रचारसभेत भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणारे नरेंद्र मोदी आपण सत्तेत येताच दहशतवादाविरोधात कडक भूमिका घेऊ असे सांगत असत. तसेच जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानची हिंमत होणार नाही असंही त्यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांचं सरकार येऊन चार वर्षे पूर्ण झाल्यावरही दहशतवादी हल्ले रोखण्यात आपल्याला फारसं यश आलेलं दिसत नाही. सीमेपलिकडून गोळीबार आणि भारताच्या सीमेत दहशतवादी पाठवण्याच्या घटना तशाच असून जम्मू आणि काश्मीरमध्येही फुटिरतावादी तरुणांनी अनेक घातपाती कारवाया केल्या आहेत.
अर्थात या काळामध्ये देशातील सुरक्षा दले शांत बसली आहेत असे नाही पण आपल्या जवानांना प्राणांची आहुती देऊन देशाचे रक्षण करावे लागले आहे. 2014 साली निवडणूक प्रचारामध्ये पाकिस्तानला संपुआ सरकारने धडा शिकविण्याऐवजी प्रेमपत्रे पाठवल्यासारखी निषेध खलिते पाठवण्यात धन्यता बाळगली, मी अशी प्रेमपत्रे लिहू शकणार नाही, पाकिस्तानला त्याच्या भाषेतच उत्तर द्यावे लागेल असे नरेंद्र मोदी सांगायचे. जर पंतप्रधानांच्या हातामध्ये देशाच्या सीमा, सीआरपीएफ, सर्व सुरक्षा दले,उपग्रह, मोबाइल नेटवर्क, बँका आहेत मग त्यांना दहशतवादी कारवाया थांबवण्यापासून कोण रोखतंय असे मोदी म्हणायचे पण प्रत्यक्षात सत्तेवर आल्यावर मात्र दहशतवादावर नियंत्रण आणण्यात ते यशस्वी झाल्याचे दिसत नाही. पाकिस्तानने भारतावरील हल्ल्यांमध्ये वाढच केली असून जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये अस्थिरताही निर्माण झाली आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान कार्यकाळाच्या शेवटच्या वर्षामध्ये 2022 दहशतवादी मारले गेले तर नरेंद्र मोदी यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात 1737 दहशतवादी मारले गेले आहेत. संपुआ सरकारच्या शएवटच्या चार वर्षांमध्ये प्रतीवर्ष 505 दहशतवादी मारले गेले पण भाजपाप्रणित रालोआ2 सरकारमध्ये प्रतीवर्ष 434 दहशतवादी मारले गेले आहेत.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या चार वर्षांमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण 177 जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते तर मोदी सरकारच्या काळामध्ये या राज्यात 4 वर्षांमध्ये 263 जवान शहिद झाले आहेत.
या काळात या राज्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येत थोडी वाढ झाली आहे. तसेच नक्षली हल्ल्यांसारख्या हल्ल्यांची संख्या कमी करण्यात मात्र सरकारला यश आल्याने ईशान्य व मध्य भारतातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये मारल्या जाणाऱ्या जवानांच्या संख्येत घट झाली आहे.
2017 साली 860 वेळा, 2016 साली 271 वेळा तसेच 2015 मध्ये 387 आणि 2014मध्ये 405 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. यावर्षी जानेवारी महिन्यापासूनच पाकिस्तानने गोळीबार सुरु केला असून 21 जानेवारीपर्यंत पाकिस्तानने 134 पेक्षा जास्तवेळा शस्त्रशसंधीचे उल्लंघन केले आहे.
बुरहान वाणी गँगचे संपूर्ण उच्चाटन
हिजबुल मुजाहिदिन या दहशतवादी संघटनेच्या एकेक कमांडर्सना टिपून मारण्यात मोदी सरकारला यश आले आहे. बुरहान वाणीपासून सुरुवात केल्यावर 10 वरिष्ठ कमांडर्सना मारण्यात भारतीय जवानांना यश आले. यामध्ये सद्दाम पाडर, आदिल खंडे, नासिर पंडित, अश्फाक भट, सब्जार भट, अनिस, इश्फाक डार, वसीम मल्लाह, वसीम शाह यांचा समावेश आहे. बुरहानच्या गँगमधला एकूण एक दहशतवादी मारल्यामुळे मोदी सरकारचे कौतुकही होते.