भाजपचे ४० नेते स्टार प्रचारक; पंतप्रधान माेदींसह नेत्यांची यादी आयाेगाकडे सुपुर्द
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 05:36 AM2023-10-20T05:36:21+5:302023-10-20T05:36:45+5:30
उद्याच्या बैठकीत पाच राज्यांतील उमेदवारांची नावे निश्चित केली जातील व त्याची घोषणा रणनीतिक रूपाने केली जाणार आहे.
संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ व मिझोराम या पाच राज्यांतील उर्वरित उमेदवारांच्या नावावर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर भाजप आक्रमक निवडणूक प्रचार सुरू करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह ४० नेत्यांना स्टार प्रचारक करण्यात आले आहे.
उद्याच्या बैठकीत पाच राज्यांतील उमेदवारांची नावे निश्चित केली जातील व त्याची घोषणा रणनीतिक रूपाने केली जाणार आहे.
भाजपने आजवर राजस्थानमधील २०० पैकी ४१, मध्य प्रदेशच्या २३० पैकी १७७, मिझोरामच्या ४० पैकी १२, छत्तीसगढच्या ९० पैकी ८५ उमेदवारांची घोषणा केली आहे; परंतु तेलंगणाच्या उमेदवारांची आतापर्यंत घोषणा करण्यात आलेली नाही.
उद्या होणाऱ्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत या सर्व पाच राज्यांतील उर्वरित उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात येईल. नावांची घोषणाही लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. छत्तीसगढमध्ये नामांकन सुरू झाले असून, मध्य प्रदेशात २१ ऑक्टोबरपासून नामांकन प्रक्रिया सुरू होणार आहे.
गडकरी, फडणवीस आणि याेगींचाही समावेश
भाजपने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी आज निवडणूक आयोगाकडे सुपुर्द केली.
यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, शिवराज सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ४० नावांचा समावेश आहे.
४० नेत्यांबरोबर भाजप आपला पाच राज्यांतील आक्रमक प्रचार सुरू करणार आहे.
यात एकाच दिवसात या सर्व ४० नेत्यांच्या ४० ठिकाणी निवडणूक सभा घेण्याची योजना आहे. याला कार्पेट बॉम्बिंग असेही म्हटले जात आहे.
तेलंगणा व राजस्थानच्या उमेदवारांबाबत चर्चा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी तेलंगणा व राजस्थानच्या भाजप नेत्यांची कोर कमिटीची बैठक झाली. एक, दोन किंवा तीन नावांचे पॅनल पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीला पाठवले जाईल.