विषारी दारू प्यायल्याने बिहारमध्ये 40 मृत्यू; अनेक अत्यवस्थ, दारूबंदीमुळे बेकायदा गाळप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 01:18 PM2021-11-07T13:18:00+5:302021-11-07T13:20:01+5:30
आतापर्यंत गोपाळगंजमध्ये १८, तर बेतियामध्ये १७ जणांचा विषारी दारूने बळी घेतला आहे.
- एस. पी. सिन्हा
पाटणा : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दारूबंदी लागू केल्यापासून सर्वत्र बेकायदा दारूचे मोठ्या प्रमाणात गाळप सुरू झाले असून, त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे त्यात काहीही मिसळले जात असून, गेल्या काही दिवसात तर राज्यात किमान ४० जण विषारी दारू प्यायल्याने मरण पावले आहेत.
गोपाळगंज, बेतिया, समस्तीपूर या तीन जिल्ह्यात सध्या विषारी दारू प्यायल्याने अनेक जण मरण पावले असून, कित्येकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये लष्करातील एक जवान व बीएसएफचा उपनिरीक्षक यांचाही समावेश आहे. ते दोघे दिवाळीत सुटी मिळाल्याने आपापल्या गावी आले होते. दोघांचा मृत्यू शुक्रवारी संध्याकाळी झाला.
आतापर्यंत गोपाळगंजमध्ये १८, तर बेतियामध्ये १७ जणांचा विषारी दारूने बळी घेतला आहे. विषारी दारू प्यायल्याने काही जणांची दृष्टीही गेली आहे. अनेकांना उलट्या, जुलाब, पोटात दुखणे असा त्रास होत आहे. समस्तीपूरमध्ये ज्याने ही दारू तयार केली, तोही अत्यवस्थ असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यात दारूचे गाळप वाढले असून, त्याशिवाय अन्य मार्गांनी दारू दुसऱ्या राज्यांतूनही आणली जात आहे.
मोठ्या शहरांमध्ये दारूबंदी बऱ्यापैकी लागू असून, तिथे पोलिसांचे लक्षही असते. त्यामुळे तिथे अशा घटना कमी आहेत. ग्रामीण भागात मात्र बेकायदा तसेच विषारी दारूने कहर केला आहे. पोलीस व राज्य सरकार यांचे दारूमाफियांवर नियंत्रण नाही आणि काही जणांचा तर या माफियांशी थेट संबंध आहे, असा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा यांनी केला.
बंदी उठवा
दारूबंदी घातल्यापासून बेकायदा धंदे वाढले आहेत आणि विषारी दारूने लोक मरण पावण्याचे प्रमाणही खूप वाढले आहेत. लोकांना असे मरू देण्यापेक्षा दारूबंदी उठवा, त्यामुळे लोकांना चांगल्या दर्जाची दारू मिळेल आणि त्यांचे जीवनही वाचेल, असे आवाहन काँग्रेसने मुख्यमंत्री नितीश कुमार यांना केले आहे.