रोज बांधणार ४0 किलोमीटरचे महामार्ग : नितीन गडकरी
By admin | Published: January 6, 2017 02:33 AM2017-01-06T02:33:42+5:302017-01-06T02:35:36+5:30
रोज २२ ऐवजी ४0 किलोमीटर अंतराचे महामार्ग बांधणीचे लक्ष्य भूपृष्ठ मंत्रालय गाठणार असून, दहा नव्या एक्स्प्रेसवेपैकी काहींचे काम प्रत्यक्ष सुरू आहे
सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
रोज २२ ऐवजी ४0 किलोमीटर अंतराचे महामार्ग बांधणीचे लक्ष्य भूपृष्ठ मंत्रालय गाठणार असून, दहा नव्या एक्स्प्रेसवेपैकी काहींचे काम प्रत्यक्ष सुरू आहे. महाराष्ट्र व राजस्थानात रेल्वे व राज्यांच्या मदतीने २५00 रेल्वे ओव्हरब्रिज (ओआरबी) बांधण्यात येईल आणि नागपूर व वाराणसीमध्ये एकात्मिक वाहतूक केंद्रेही उभारण्यात येत आहेत, अशा घोषणा केंद्रीय भूतल परिवहन राष्ट्रीय मार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केल्या. आपल्या मंत्रालयांच्या अडीच वर्षांच्या कामगिरीची ते माहिती देत होते.
यूपीए काळात रोज ३ किलोमीटर्स महामार्ग बांधले जात होते. या थंडावलेल्या कामाला वेग देत, रोज २२ किलोमीटर्सची रस्ते बांधणी आम्ही सुरू केली. यापुढे रोज ४0 कि.मी. अंतराची महामार्ग उभारणी देशात सुरू झाल्याचे पाहायला मिळेल, असा दावा करून गडकरी म्हणाले, ‘१0 एक्स्प्रेसवेना सुरुवात होत असून, काही कामे सुरूही झाली आहेत, एक्स्प्रेसवेमध्ये मुख्यत्वे नागपूर हैद्राबाद बंगळुरू ११00 कि.मी. लांबीच्या, तर मुंबई-बडोदे ४00 कि.मी.इत्यादी १0 आंतरराज्य एक्सप्रेसवेचा समावेश आहे. आतापर्यंत ४ लाख ६0 हजार कोटींची कामे झाली असून, त्यातून १४ हजार ३९0 किलोमीटर्स लांबीचे रस्ते बांधण्यात आले आहेत.
जिल्हा मुख्यालयांना राष्ट्रीय महामार्गांशी जोडण्यासाठी ६0 हजार कोटी रुपये खर्च करून ९ हजार किलोमीटर्सचे रस्ते बांधत आहोत. दोन लाख किमीचे नवे राष्ट्रीय महामार्ग उभारण्याचे ठरवले आहे. महामार्ग बांधणी प्रकल्पातून २ कोटी लोकांना रोजगार मिळेल व जीडीपीतही २ टक्क्यांची भर पडेल, असा दावा गडकरींनी केला. यापुढे वाहनाला लावलेल्या टॅगमुळे टोल नाक्यावर थांबावे लागणार नाही. संबंधित टोल नाक्यांवर नोंदीनुसार वाहनमालकाच्या बँक खात्यातून रक्कम कापली जाईल. या तंत्रज्ञानामुळे वेळ व इंधनाची मोठी बचत होईल, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला राज्यमंत्री पी. राधाकृष्णन व परिवहन सचिव संजय मित्रा हजर होते.