भारतात सेवा देणाऱ्या ४० टक्के वैमानिकांचे प्रशिक्षण परदेशात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 06:22 AM2021-12-18T06:22:02+5:302021-12-18T06:22:34+5:30
‘डीजीसीए’कडून वितरित झालेल्या व्यावसायिक उड्डाण परवान्यांपैकी ४० टक्के वैमानिकांचे प्रशिक्षण परदेशात झाले असून, त्यांनी भारतीय विमान प्रशिक्षण संस्थांकडे पाठ फिरवली आहे.
मुंबई : भारतात जागतिक दर्जाचे वैमानिक घडवण्याचा हवाई वाहतूक मंत्रालयाचा मनोदय बोलापुरताच राहिला आहे. यंदा ‘डीजीसीए’कडून वितरित झालेल्या व्यावसायिक उड्डाण परवान्यांपैकी ४० टक्के वैमानिकांचे प्रशिक्षण परदेशात झाले असून, त्यांनी भारतीय विमान प्रशिक्षण संस्थांकडे पाठ फिरवली आहे.
गेल्या काही वर्षांत भारतीय हवाई वाहतूक क्षेत्राची व्याप्ती दुपटीने वाढली आहे. ही गती कायम राखण्यासाठी नव्या मार्गिका खुल्या करण्यासह गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारतात जागतिक दर्जाचे वैमानिक घडवण्यासाठी प्रशिक्षण केंद्रांचा विस्तार केला जात आहे; नव्या केंद्रांना मंजुरीही दिली जात आहे. असे असले तरी प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा ओढा परदेशातील संस्थांकडे आहे.
चालू वर्षात डीजीसीएने आजवरचे सर्वाधिक ७५६ परवाने वितरित केले. गेल्या वर्षी ही संख्या ५७८ इतकी होती. यंदा वितरित झालेल्या परवान्यांपैकी ४० टक्के वैमानिकांनी परदेशी संस्थांमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे भारतात नव्या प्रशिक्षण संस्था उभारून उपयोग काय, असा सवालही उपस्थित होत आहे.