सलाम! हवाई दलाच्या निवृत्त कर्मचाऱ्यानं संरक्षण मंत्रालयाला दिली आयुष्यभराची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 02:49 PM2019-07-16T14:49:57+5:302019-07-16T14:52:27+5:30
राजनाथ सिंह यांच्याकडे धनादेश सुपूर्द
नवी दिल्ली: एखादा सैनिक लष्करातून पडू शकतो. मात्र सैन्याच्या मनातून लष्कर कधीही बाहेर पडत नाही, असं म्हटलं होतं. याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. चाळीस वर्षांपूर्वी भारतीय हवाई दलातून निवृत्त झालेल्या सी. बी. आर. प्रसाद यांनी त्यांची आयुष्यभराची कमाई संरक्षण मंत्रालयाला देणगी स्वरुपात दिली आहे.
'मी भारतीय हवाई दलात ९ वर्षे सेवा दिली. भारतीय रेल्वेनं मला नोकरीची ऑफर दिल्यानं मी हवाई दलातून बाहेर पडलो. मात्र दुर्दैवानं मला ती नोकरी मिळाली नाही. त्यानंतर मी कुक्कुटपालनचा लहानसा व्यवसाय सुरू केला. सुदैवानं त्या व्यवसायानं मला आधार दिला,' असं प्रसाद यांनी सांगितलं. 'कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर हवाई दलाला काही तरी द्यायला हवं, असा विचार माझ्या मनात होता. कारण हवाई दलानं मला खूप काही दिलं आहे. त्यामुळेच मी संरक्षण दलाला १ कोटी ८ लाख रुपयांची देणगी दिली,' असं त्यांनी पुढे सांगितलं.
प्रसाद यांनी सोमवारी (काल) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देणगीचा धनादेश राजनाथ यांना दिला. प्रसाद यांनी ३० वर्षे कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला. यासोबतच समाजाचं ऋण फेडण्यासाठी त्यांनी क्रीडा विद्यापीठाचीदेखील स्थापना केली. प्रसाद यांनी जवळपास ९ वर्षे भारतीय हवाई दलाच काम केलं.
संरक्षण दलाला आयुष्यभराची कमाई देण्याचा निर्णय घेत असताना कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती, असा प्रश्न प्रसाद यांना विचारण्यात आला. त्यावर कुटुंब या निर्णयामागे अगदी ठामपणे उभं राहिल्याचं त्यांनी सांगितलं. 'मी माझ्या मुलीला माझ्या संपत्तीतील २ टक्के आणि पत्नीला १ टक्के वाटा दिला. त्यानंतर उर्वरित रक्कम संरक्षण दलाला दिली. सामाजिक जबाबदारी म्हणून मी हा निर्णय घेतला,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली.