पुरातन मंदिरांच्या जतनासाठी मुस्लीम वृद्धाचा ४० वर्षे लढा
By admin | Published: October 31, 2016 07:06 AM2016-10-31T07:06:24+5:302016-10-31T07:06:24+5:30
३४ हिंदू मंदिरांचे जतन करण्यासाठी मोहम्मद यासिन पठाण हे मुस्लीम वृद्ध गृहस्थ गेली ४० वर्षे अथक प्रयत्न करीत आहेत.
पाथरा (प. मिदनापूर) : पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील पाथरा या गावात कांगसाबाती नदीच्या काठी असलेल्या १८ व्या शतकातील ३४ हिंदू मंदिरांचे जतन करण्यासाठी मोहम्मद यासिन पठाण हे मुस्लीम वृद्ध गृहस्थ गेली ४० वर्षे अथक प्रयत्न करीत आहेत. सरकारी कार्यालयातून शिपाई म्हणून निवृत्त झालेले पठाण ६३ वर्षांचे असून हल्ली त्यांची तब्येत त्यांना साथ देत नाही. त्यामुळे आपल्या हतातीत या मंदिरांच्या जतनाचे काम पूर्ण व्हावे यासाठी ते आतूर आहेत.
विशेष म्हणजे पठाण ज्या मंदिरांचे जतन करण्यासाठी धडपडत आहेत त्यापैकी एकाही मंदिरात कोणतीही मूर्ती नाही व ही मंदिरे फक्त पुराणवास्तू म्हणून महत्वाची आहेत. तरीही सुरुवातीस त्यांच्याच समाजाने ’काफिर’ ठरवून त्यांना वाळित टाकले होते. भारतीय पुरातत्वविभागाने (एएसआय) सन २००३ मध्ये या मंदिरांच्या जागा ताब्यात घेतल्या तेव्हा पठाण यांच्या लढ्यास यश आल्याचे वाटले होते. परंतु १० एकर जमिनीच्या संपादनामुळे घोडे अडले ते अजूनही अडलेलेच आहे. ही जमीन ‘एएसआय’ने स्वत: संपादित करावी, असे राज्य सरकार म्हणते. तर ‘एएसआय’ सांगते की राज्य सरकारने ती संपादित करून आमच्या ताब्यात द्यावी, दोन्ही मूत्रपिंडे नीटपणे काम करीत नसल्याने व हृदयधमनीत अवरोध निर्माण झाल्याने पठाण यांना स्वत:ची फार दिवसांची खात्री वाटत नाही. आपले काही बरे वाईट झाले तर इतक्या वर्षांचे कष्ट पाण्यात जातील, अशी त्यांना भीती आहे.
पठाण म्हणतात, एएसआयने सुमारे १९ मंदिरांचे जतन पूर्ण केले आहे. परंतु जमीन संपादनावरून केंद्र व राज्य सरकार यांच्यात मतभेद झाल्याने बाकीचे काम गेली तीन वर्षे ठप्प झाले आहे. ज्या १० एकर जमिनीच्या संपादनाचा प्रश्न लटकला आहे त्यापैकी बऱ्याच जमिनींवर तलाव आहेत किंवा ती सखल आणि पडिक जमीन आहे. काही जमिनींचे मालक पाथरामध्ये राहणारे आहेत, तर काही मिदनापूर, कोलकाता व लंडनमध्ये राहतात. ते जमिनीचा मोबदला मागत आहेत. शेतजमीन वगळून उरलेल्या जागेवर पर्यटन केंद्र विकसित करावे, अशी विनंती पठाण यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. ‘एएसआय’च्या कोलकाता परिमंडळाचे अधीक्षक पुरातत्वज्ञ शांतनू मैती म्हणाले की, जमीन संपादनासाठी आमचे काम सुरु आहे. यासिन पठाण यांच्या मध्यस्थीने आम्ही स्थानिक लोकांशी बोलत आहोत. पाथरा मंदिर संकुलांच्या तीन जागांचे पुरातन वास्तू म्हणून जतन करण्याची आमची योजना आहे. जमिनीची योग्य किंमत ठरविण्याचे कामही सुरु आहे. (वृत्तसंस्था)
>संस्कृती रक्षणासाठी स्फूर्ती
प्रसिद्ध पुरातत्व तज्ज्ञ व प. बंगालमधील पुरातन वास्तू व लोकसंस्कृतीवर २४ पुस्तके लिहिणारे तारापदा सांत्रा यांच्यापासून स्फूर्ती घेऊन पठाण स्वत: मुस्लीम असूनही मंदिरांच्या जतनासाठी उद्युक्त झाले.स्थानिक मुस्लिमांकडून सुरुवातीस त्यांना टीका व उपहास सोसावा लागला. परंतु नंतर अनेक मुस्लिम व हिंदूही त्यांच्यासोबत आले आणि त्यांनी १९९२ मध्ये ‘पार्था आर्किआॅलॉजिकल प्रिझर्व्हेशन कमिटी’ स्थापन करून पद्धतशीरपणे काम सुरू केले.
>तीन महिलांना श्रेय : ‘एएसआय’ मंदिरांच्या जतनास तयार होण्याचे श्रेय पठाण तीन महिलांना देतात. त्या म्हणजे माजी रेल्वेमंत्री व आताच्या प. बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातील तत्कालीन सहसचिव कस्तुरी गुप्ता मेनन आणि ‘एएसआय’च्या महासंचालक गौरी चटर्जी.