एसपींच्या कार्यालयावर ४०० जणांचा हल्ला; मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 07:37 AM2024-02-17T07:37:54+5:302024-02-17T07:38:19+5:30
मणिपूरमध्ये पुन्हा भडकली हिंसा; २ ठार
इम्फाळ : मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यामध्ये गुरुवारी मध्यरात्री तीनशे ते चारशे लोकांच्या जमावाने पोलिस अधीक्षक व उपायुक्तांच्या कार्यालयावर हल्ला केला. संतप्त जमावाने यावेळी दगडफेक केली. तसेच, एका बससहित अनेक गाड्यांना आग लावली. या जमावाला पांगविण्यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्सने प्रथम अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या तसेच बळाचा वापर केला. या घटनांत दोन जणांचा मृत्यू झाला व ४०हून अधिक जण जखमी झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी अद्याप त्या माहितीस दुजोरा दिलेला नाही.
या हिंसाचारामुळे चुराचंदपूर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. पोलिस हेडकॉन्स्टेबल सियामलालपॉल हा सशस्त्र गुंडांबरोबर वावरत असल्याचा एक व्हिडीओ १४ फेब्रुवारी रोजी व्हायरल झाला होता. या पोलिसाने गुंडांसोबत सेल्फीही काढला होता. त्यामुळे सियामलालपॉल याला तत्काळ निलंबित करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी मध्यरात्रीनंतर चुराचंदपूर येथे जमावाने सरकारी इमारतींवर हल्ला केला.
नेमकी मागणी काय?
nचुराचंदपूर जिल्ह्यात शुक्रवारी तणावाचे वातावरण होते. पोलिस हेडकॉन्स्टेबल सियामलालपॉल याला चुकीच्या कारणांवरून निलंबित करण्यात आले असून ही कारवाई रद्द करावी,
nही कारवाई करणाऱ्या पोलिस अधीक्षकांनी चुराचंदपूर जिल्हा सोडून निघून जावे, अशी काही संघटनांनी मागणी केली आहे.