400 दिवस अन् 10 घोटाळे; दिल्लीतून AAP ला उखडण्याचा भाजपचा प्लॅन, केजरीवालांचं टेन्शन वाढणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 01:20 PM2023-03-10T13:20:18+5:302023-03-10T13:22:14+5:30
अरविंद केजरीवाल सरकार सध्या दारू घोटाळ्यात अडकले असून येणाऱ्या काळात आम आदमी पार्टीला भाजपच्या अत्यंत आक्रमक मोहिमेचाही सामना करावा लागणार आहे.
दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप) आपल्या 9 वर्षांच्या सत्ताकाळातील सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करताना दिसत आहे. येथील अरविंद केजरीवाल सरकार सध्या दारू घोटाळ्यात अडकले असून येणाऱ्या काळात आम आदमी पार्टीला भाजपच्या अत्यंत आक्रमक मोहिमेचाही सामना करावा लागणार आहे.
सध्या दारू घोटाळ्यात तिहार तुरुंगात गेलेल्या मनीष सिसोदियां विरोधात निदर्शने करत असलेल्या भाजपने पुढील 400 दिवसांचा प्लॅन तयार केला आहे. या काळात दिल्लीत आपला जबरदस्त जम बसवलेल्या आपला उखडून टाकण्यासाठी भाजप सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल.
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, दिल्ली सरकारमधील कथित 10 घोटाळ्यांचा प्रचार करून भाजप आपच्या सर्वात मोठ्या ताकदीवरच घाव घालण्याच्या तयारीत आहे. पक्षातील सूत्रांनी म्हटले आहे की, अरविंद केजरीवाल यांच्या 'कट्टर प्रामाणिकपणा'च्या दाव्यांचे सत्य जनतेसमोर मांडले जाईल आणि 'आप' संयोजकच कशा प्रकारे भ्रष्टाचारासाठी जबाबदार आहेत? हे सांगितले जाईल. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पक्षाच्या एका नेत्याने म्हटले आहे, 'आम्ही पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत 400 दिवस यावर काम करू. कॅबिनेट सहकाऱ्यामागे चेहरा लपवणाऱ्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आणला जाईल. हे अभियान 2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपर्यंत रोज सुरू राहील.'
आणखी एका नेत्याने म्हटले आहे, "आप सरकारच्या विविध खात्यांमध्ये आतापर्यंत किमान 10 घोटाळे समोर आले आहेत, ज्यांत केजरीवाल मास्टरमाइंड आहेत. दारू घोटाळ्याप्रमाणेच या योटाळ्यांवरही चर्चा केली जाईल." दिल्लीचे कार्यवाहक अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधुरी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष शुक्रवारी धरणे आंदोलन करणार आहे.
याशिवाय भाजप दारू घोटाळ्याबरोबरच क्लारूम घोटाळा, जल बोर्ड घोटाळा, डीटीसी घोटाळा, हवाला घोटाळा, जाहिरातीतील घोटाळा आणि हेरगिरी घोटाळा आदी मुद्द्यांवरही आप सरकारला घेरेल,असे भाजपच्या काही नेत्यांनी म्हटले आहे.