रस्ते अपघातांत रोज ४०० जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2016 04:11 AM2016-06-10T04:11:28+5:302016-06-10T04:11:28+5:30
भारतात रोज रस्ते अपघातात किमान ४०० जण मरण पावतात, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली.
नवी दिल्ली : सदोष बांधणीमुळे भारतात रोज रस्ते अपघातात किमान ४०० जण मरण पावतात, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली. एकनिष्ठ काम आणि प्रामाणिक प्रयत्न करूनही गेल्या २ वर्षांत फार काही बदल झाला नसल्याची कबुलीही त्यांनी दिली.
भारतातील रस्ते अपघाताबाबत २०१५ सालचा अहवाल जारी करताना, केंद्रीय भूपृष्ठवाहतूकमंत्री गडकरी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ‘या अहवालाने मी फारच व्यथित झालो आहे. भारतात दर तासाला ५७ अपघात होतात आणि त्यात १७ जणांचा मृत्यू होतो. अपघातात मरण पावणाऱ्यांत ५४ टक्के लोक तरुण म्हणजे १५ ते ३४ वयांतील असतात.’
‘हा अहवाल पाहून जनता आमच्यावर टीका करेल, तरीही मी हा अहवाल उघड करीत आहे. गेल्या दोन वर्षांत आम्ही निष्ठेने आणि प्रामाणिक प्रयत्न करीत काम केले, पण त्यातून फारसा बदल झाला नाही. यापुढे असे आम्ही होऊ देणार नाही. या अहवालाने आपणास खूपच वेदना होत आहेत,’ असेही गडकरी म्हणाले.
अहवाल सादर करताना गडकरी म्हणाले की, ‘मृतांची ही आकडेवारी युद्ध, रोगराई किंवा दहशतवादी कारवायांशी निगडित नाही. केवळ अपघातांतून असे मानवी बळी आम्ही जाऊ देणार नाही. गेल्या दोन वर्षांत याबाबत आम्ही प्रधानमंत्री सडक सुरक्षा योजनेसारख्या उपाययोजना राबविल्या. त्यात रस्त्याच्या बांधणीवर करण्यात येणाऱ्या एकूण खर्चापैकी एक रक्कम सुरक्षेवर खर्च करण्यात येते. ही रक्कम पाच हजार कोटी रुपयांच्या आसपास जाते.’
या प्रकाराबद्दल त्यांनी यूपीए सरकारला दोष देण्याचाही प्रयत्न केला. ते म्हणाले की, ‘यूपीएच्या राजवटीत प्रचंड पैसा खर्च करून मोठ्या प्रमाणावर उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधण्यात आले. दिल्ली-गुडगाव पट्ट्यासह महत्त्वाच्या मार्गांवर ही कामे करण्यात आली. त्यातूनही मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)
>2015 मध्ये झालेल्या एकूण रस्ते अपघातांपैकी ७७.१२ टक्के अपघातांना ‘चालकाची चूक’ कारणीभूत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. रस्ते अपघातातील हेच प्रमुख ‘सदोष अभियांत्रिकी’ कारण असल्याचे म्हटले आहे.