Earthquakes: दोन वर्षांत ४०० भूकंपाचे धक्के, भारतातील या ठिकाणी राहणं झालंय भयावह, भूगर्भात चाललंय तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 02:37 PM2023-02-26T14:37:12+5:302023-02-26T14:38:03+5:30
Earthquakes: गुजरातमधील अमरेली जिल्हा गेल्या दोन वर्षांपासून एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये येथे तब्बल ४०० भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे.
गुजरातमधील अमरेली जिल्हा गेल्या दोन वर्षांपासून एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये येथे तब्बल ४०० भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे. भूकंपशास्त्राच्या भाषेत या प्रकाराला भूकंप स्वार्म म्हटलं जातं. स्वार्म म्हणजे भूकंपाच्या कमी तीव्रतेच्या धक्क्यांची मालिका असते. हे धक्के कमी वेळासाठी जाणवतात. मात्र ते अनेक दिवसांपर्यंत जाणवत असतात. अमरेली जिल्ह्यामध्ये असलेल्या मिटियाला गावातील ग्रामस्थांनी या भूकंपाच्या धक्क्यांचा एवढा धसका घेतला आहे की, आता ते खबरदारी म्हणून घराबाबेर झोपू लागले आहेत.
मिटियालामधील ग्रामस्थ मोहम्मद राठोड याने सांगितले की, या धक्क्यांच्या भीतीमुळे सरपंचांसह गावातील बहुतांश लोकांनी रात्री घराबाहेर झोपण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, गांधीनगर येथील भूकंप संशोधन संस्थेचे महासंचालक सुमेर चोप्रा यांनी सांगितले की, या भूकंपीय हालचालींचं कारण टेक्टॉनिक क्रम आणि जलीय भार आहे. त्यांनी पुढे सांगितले की, गेली दोन वर्षे आणि दोन महिन्यांच्यादरम्यान, अमरेलीमध्ये ४०० सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामधील ८६ टक्के भूकंपांची तीव्रता ही दोनपेक्षा कमी होती. तर १३ टक्के भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता ही दोन ते तीनच्या दरम्यान होती. केवळ पाच धक्क्यांची तीव्रता ही ३ पेक्षा अधिक होती.
त्यांनी सांगितले की, बहुतांश भूकंपाचे धक्के हे लोकांना जाणवले नाहीत. तर त्यांची नोंद ही आमच्या यंत्रावर झाली. अमरोलीसह सौराष्ट्रचा बहुतांश भाग हा भूकंपीय क्षेत्र ३ अंतर्गत येतो. धोक्याच्या दृष्टीने हा भाग मध्यम धोक्याच्या श्रेणीत आहे. अमरेलीमध्ये फॉल्ट लाइन १० किमीपर्यंत आहे. तर शक्तिशाली भूकंपासाठी ही लाइन ६० ते ७० किमी असते. अमरेलीमध्ये सर्वाधिक ४.४ तीव्रतेचा भूकंप १३० वर्षांपूर्वी १८९१ मध्ये आला आहोत. तर सौराष्ट्र क्षेत्रातील सर्वात मोठा भूकंप हा जुनागडमध्ये २०११ मध्ये आला होता.
या महिन्यामध्ये २३ फेब्रुवारीपासून ४८ तासांमध्ये अमरेलीच्या सावरकुंडला आणि खंबा तालुक्यामध्ये ३.१ ते ३.४ तीव्रतेचे भूकंपाचे चार धक्के नोंदवले गेले. त्यामुळे येथील रहिवासी चिंतीत आहेत. गुजरातमधील कच्छमध्ये २००१ मध्ये आलेल्या भूकंपामध्ये १९ हजार ८०० जणांचा मृत्यू झाला होता. तर १.६७ लाख लोक जखमी झाले होते.