Coronavirus: कोरोना विषाणूचे भारतात २४ तासांत ४०० नवे रुग्ण; १३२ जण झाले बरे; एकूण ५८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 12:43 AM2020-04-02T00:43:48+5:302020-04-02T06:35:15+5:30
दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला हजर राहिलेल्यांनी प्रवास केल्यानंतर देशभरात १५४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.
नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मागील २४ तासांत ४०० ने वाढ झाली आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील संक्रमणवाढ नसून, दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावलेल्यांनी प्रवास केल्यानंतर ही वाढ झाल्याचे प्राथमिकरीत्या समोर आले, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले.
देशात १९०० रुग्ण आणि ५८ बळी आहेत. मागील २४ तासांत १३२ जण बरे झाले किंवा रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले की, रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ ही राष्ट्रीय स्तरावरील वाढ नोंदवत नाही. मात्र, यात कुठेही काही कमी झाले तर ती संख्या वाढू शकते. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू नये, यासाठी लोकांनी सोशल डिस्टन्सिंग व लॉकडाऊनची मार्गदर्शक तत्त्वे पाळावीत. गर्दी टाळावी.
दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला हजर राहिलेल्यांनी प्रवास केल्यानंतर देशभरात १५४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. यात जम्मू-काश्मीरचे २३, तेलंगणा २०, दिल्ली १८, तमिळनाडू ६५, आंध्र प्रदेश १७, अंदमान निकोबार ९ व पुडुच्चेरीचे दोन आहेत. सर्व राज्यांना सतर्क करण्यात आले असून, त्यांना शोधण्याचे निर्देश देण्यात आले. लक्षणे दिसणाऱ्यांना कोरोंटाईन, आयसोलेशन करण्याचे किंवा रुग्णालयात पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिल्लीतील घटनेशी संबंधित १,८०० जणांना ९ कॉरेंटाईन सेंटर्स व रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.