पृथ्वीपासून 400 किमीवर 400 टनांचे स्पेस स्टेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 10:58 AM2024-03-06T10:58:57+5:302024-03-06T10:59:29+5:30
इस्रोच्या प्राथमिक अंदाजानुसार स्पेस स्टेशनचे एकूण वजन सुमारे ४०० टनांपर्यंत असू शकते. इस्रोने स्पेस स्टेशनसाठी तंत्रज्ञान विकसित करण्यास सुरुवात केली आहे.
बंगळुरू : अंतराळात आणखी एक उंच झेप घेण्याची तयारी भारताने सुरू केली आहे. अंतराळातील भारताच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा एक भाग म्हणून, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने शक्य तितक्या लवकर देशातील पहिले अंतराळ स्थानक उभारण्याचे काम सुरू केले आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले की, स्पेस स्टेशनचे पहिले मॉड्यूल येत्या काही वर्षांत लॉन्च केले जाऊ शकते.
अंतराळ स्थानक पृथ्वीच्या खालील कक्षेत स्थापित केले जाईल. त्यात ४ अंतराळवीर राहू शकतील. विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक डॉ. उन्नीकृष्णन नायर म्हणाले की, पृथ्वीपासून ४०० किलोमीटर उंचीच्या कक्षेत स्थापित होण्यासाठी देशातील सर्वात शक्तिशाली रॉकेट ‘बाहुबली’ किंवा लॉन्च व्हेईकल मार्क-३ वापरण्याची योजना आहे. स्पेस स्टेशनचे मुख्य मॉड्यूल लाइफ सपोर्ट आणि कंट्रोल सिस्टमने सुसज्ज असेल. हे ऑक्सिजन निर्माण करण्यास, कार्बन डायऑक्साइड काढून टाकण्यास मदत करेल.
विशेष डॉकिंग पोर्ट तयार करणार
स्पेस स्टेशनचे एक टोक हे क्रू मॉड्यूल आणि अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या रॉकेटसाठी डॉकिंग पोर्ट असेल. इस्रो यासाठी एक विशेष डॉकिंग पोर्ट विकसित करत आहे.
हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या डॉकिंग पोर्टसारखे असू शकते. स्पेस स्टेशनमध्ये चार स्वतंत्र मॉड्यूल्स आणि सौर पॅनेलच्या किमान चार जोड्या असू शकतात.
...तर भारत बनणार चौथा देश
- २०३५ पर्यंत अंतराळ स्थानक उभारण्याची भारताची योजना आहे. यानंतर अमेरिका, रशिया आणि चीननंतर स्वतःचे अंतराळ स्थानक असणारा भारत चौथा देश बनेल.
- भारतीय अंतराळ स्थानकाने केलेल्या छायाचित्रानुसार पहिल्या टप्प्यात दोन मोठे सौर पॅनेल असतील, जे स्पेस स्टेशन चालविण्यासाठी वीज निर्माण करतील.