म्हैसूरमधल्या शाही घराण्याची 400 वर्षांनी 'शापा'तून मुक्तता, कुटुंबाला मिळाला वारस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 09:54 PM2017-12-07T21:54:05+5:302017-12-07T21:57:22+5:30
म्हैसूर : वाडियार या शाही कुटुंबाला 400 वर्षांनी वारस मिळाला आहे. राजपुत्राच्या जन्मामुळे राजघराण्यात आनंद साजरा केला जातोय.
म्हैसूर : वाडियार या शाही कुटुंबाला 400 वर्षांनी वारस मिळाला आहे. राजपुत्राच्या जन्मामुळे राजघराण्यात आनंद साजरा केला जातोय. म्हैसूर राजघराण्यातील वाडियार कुटुंबात कधीही मुलाचा जन्म होणार नाही, असा त्यांना शाप मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या शापातून मुक्तता झाल्याची भावना वाडियार कुटुंबीयांमध्ये आहे. राजा यदूवीर आणि त्रिशिका यांच्या पोटी पुत्ररत्नाचा जन्म झाला आहे.
आतापर्यंत वाडियार राजघराण्याचा वारस हा दत्तक घेतला जात होता. राणी प्रमोदा आणि राजा श्रीकांतदत्ता यांना मूल नसल्यामुळे त्यांनी राजा यदूवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांना दत्तक घेतलं होतं. गेल्या वर्षी राजा यदूवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांचा विवाह राजस्थानमधील डुंगपूरच्या राजकुमारी त्रिशिकासोबत झाला होता. राजा यदूवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांनी बोस्टनमध्ये शिक्षणाचे धडे गिरवले आहेत. तर त्रिशिका यांनी अमेरिकेतून उच्चशिक्षणाची पदवी संपादन केली आहे.
काय आहे शाप ?
1612मध्ये युद्धात विजयनगर साम्राज्याचा पराभव झाल्यानंतर म्हैसूर राजघराण्याच्या सैनिकांनी विजयनगर साम्राज्याचा खजिना लुटला. त्यानंतरही राणी अलमेलम्माजवळ असलेले शाही घराण्याचे दागदागिनेही वाडियार राजांनी वाडियार घराण्याला देण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी राणी अलमेलम्मा यांनी त्यास नकार दर्शवला. त्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला असता, त्यांनी वाडियार राजघराण्याला शाप दिल्याची आख्यायिका सांगितली जाते. या शापामुळेच वाडियार घराण्यात आजमितीस पुत्र जन्माला आला नाही, असंही बोललं जातं. परंतु आता हे घराणं शापमुक्त झाल्याची भावना राजघराण्यातील माणसं व्यक्त करत आहेत.