उत्तर प्रदेश, बिहारमध्ये विजा पडून ४१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 04:16 AM2018-06-10T04:16:38+5:302018-06-10T04:16:38+5:30

उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील भागांत व बिहारमध्ये दोन दिवसांत काही ठिकाणी विजा कोसळून व वादळामुळे किमान ४१ जण मरण पावले आहेत.

41 people die in Uttar Pradesh, Bihar | उत्तर प्रदेश, बिहारमध्ये विजा पडून ४१ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये विजा पडून ४१ जणांचा मृत्यू

Next

लखनऊ/पाटणा  - उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील भागांत व बिहारमध्ये दोन दिवसांत काही ठिकाणी विजा कोसळून व वादळामुळे किमान ४१ जण मरण पावले आहेत. याखेरीज दोन्ही राज्यांत मिळून ३0हून अधिक जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील भागांत सध्या प्रचंड उकाडा आहे. बऱ्याच ठिकाणी तापमान ४२ वा त्याहून अधिक आहे. असे असताना काही भागांत वादळ व विजा पडणे सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागांमध्ये वादळ व विजा पडल्याने पाच महिला व दोन लहान मुलांसह १0 जण मरण पावले. याशिवाय राज्याच्या अमेठी व रायबरेली जिल्ह्यांमध्ये मिळून ११ जण मरण पावले आणि १६ जण जखमी झाले. सुलतानपूरमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला, तर सीतापूर व बहराईच या जिल्ह्यांत प्रत्येकी दोन जण ठार झाले. एवढेच नव्हे, तर पूर्वांचल भागांत उष्माघाताने दोन जणांचा बळी घेतला आहे. बांदा, इटावा, औरिया या जिल्ह्यात उष्णतेची लाट असून, लोकांनी दिवसा कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. (वृत्तसंस्था)

बिहारच्या सहरसामध्ये ६ बळी; मृतांच्या कुटुंबीयांना मदत

बिहारच्या सहरसा जिल्ह्यात विजा पडून ६ जण मरण पावले आहेत, तर दरभंगामध्ये चौघांचा व माधेपुरा जिल्ह्यात एकाचा याचमुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय तीन जिल्ह्यांत मिळून १३ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयांत उपचार सुरू असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली.

राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरवर्षी जून ते सप्टेंबर या काळात बिहारमध्ये विजा पडणे व त्यामुळे लोकांचा मृत्यू होणे हे प्रकार होतच असतात. या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यातच तिथे विजा पडू लागल्या. त्याआधी बिहार व उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये धुळीचे वादळ झाले; आणि त्यातही काही जण मरण पावले होते.

Web Title: 41 people die in Uttar Pradesh, Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.